खारेपाटण (प्रतिनिधी) : राज्यातील कायदा सुव्यवस्था सुरळीत रहावी व राज्यातील सर्व नागरिकांची सुरक्षेची काळजी घेणे ही जेवढी जबाबदारी पोलिसाची आहे. तेवढीच ग्रामिण पातळीवर पोलिसांना सर्वतोपरी मदत व सहकार्य करणाऱ्या पोलिस पाटील यांची देखील आहे.मात्र राज्यातील महसूल विभाग अंतर्गत येणारी “पोलीस पाटील” ही पदे बऱ्याच अनेक वर्षांपासून रिक्त असून ती तातडीने भरण्यात यावी.या मागणीसाठी खारेपाटण गावचे माजी सरपंच तथा खारेपाटण गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रमाकांत राऊत हे दिनांक १३ मार्च २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथे एक आगळ – वेगळं “झोप काढू आंदोलन” करणार असल्याची माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली.
याबाबतचे लेखी पत्र मा. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना देण्यात आले असून.आमदार नितेश राणे,जिल्हा पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग,मा.उपविभगिय प्रांत अधिकारी कणकवली, तहसीलदार कणकवली तसेच पोलीस निरीक्षक कणकवली पोलीस ठाणे कणकवली यांना देखील आंदोलनाची लेखी प्रत रवाना करण्यात आली असल्याचे रमाकांत राऊत यांनी सांगितले.
खारेपाटण विभाग अंतर्गत येणाऱ्या नडगीवे,वायंगणी,वारगाव, कुरगवणे व खारेपाटण या गावातील पोलीस पाटील हे सेवा निवृत्त झाल्यामुळे सद्या या गावातील पोलीस पाटील पदे रिक्त आहेत. खारेपाटण मध्ये तर गेली ५ वर्षे पद रिक्त असून सद्या चिंचवली गावचे पोलीस पाटील श्री भालेकर यांचेकडे खारेपाटणचा अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे. शिवाजीपेठ, बंदरगाव,काजिर्डा,संभाजी नगर व खारेपाटण असा ५ महसुली गावांचे मिळून सुमारे ६००० लोकसंख्या असणाऱ्या मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारेपाटण गावात पोलीस पाटील पद गेली अनेक वर्षे रिक्त असणे ही दुर्देवी बाब असल्याचे श्री राऊत यांनी म्हंटले आहे.
तसेच खारेपाटण पासून चिंचवली हे गाव ५ की.मी अंतरावर असून खारेपाटण मधील नागरिकांना प्रशासकीय दाखले व पोलीस पाटील यांचा दाखला आणण्यासाठी चिंचवली गावात जावे लागते.सदर गावात जाण्यासाठी एस टी बस नसल्याने नागरिकांना खाजगी वाहनाने जावे लागते.यामुळे नाहक त्रास भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे.तसेच मा.उपविभागीय अधिकारी कणकवली यांना देखील पोलीस पाटील रिक्त पदाच्या भरती बाबत पत्रव्यहार करून वाट बघण्यात आली.मात्र प्रांत कार्यालयाकडून आजपर्यंत सदर विषयाबाबत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हंटले आहे.
दरम्यान खारेपाटण गावातील पोलीस पाटील पद हे दिनांक १० मार्च २०२३ पर्यंत तातडीने न भरल्यास खारेपाटण गावातील नागरिकांना नाईलाजास्तव दिनांक १३ मार्च २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे प्रशासनाच्या विरोधात “झोप काढू आंदोलन ” काढावे लागणार असल्याचा इशारा खारेपाटण गावचे माजी सरपंच तथा खारेपाटण गाव तंटामुक्ती समिती अध्यक्ष रमाकांत राऊत यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.