कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यास बदलीची बक्षिसी मिळाल्यास मनसे करणार ठेकेदारांच्या “त्या” कामांची पोलखोल
कुडाळ (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडील काही भ्रष्ट अधिकारी व काही मुजोर ठेकेदार मिळून बांधकाम विभागात प्रामाणिक व कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून प्रसिद्ध कनिष्ठ अभियंता विनायक चव्हाण यांच्या बदलीसाठी ठेकेदार लॉबी सर्वपक्षीय नेत्यांच्या दारोदारी भेटी देत आहेत. कुडाळ बांधकाम उपविभागात बोकाळलेला तत्कालीन कालावधीतील भ्रष्टाचार व तद्नंतर झालेला निलंबनाचा प्रकाराचे बारकाईने अवलोकन करता यापूर्वी कुडाळ बांधकाम उपविभागात कोणत्या प्रकारची कार्यपद्धती राबविली जात होती याची प्रचिती कुडाळ वासीयांनी अनुभवली आहे.त्याजागी आलेल्या अधिकारी निविदेतील तरतुदीनुसार ठेकेदारांकडून कामे करून घेऊ लागल्याने काही मुजोर व भ्रष्ट ठेकेदारांना त्याचा अडसर ठरू लागला आहे व त्यातून त्यांची इतरत्र बदली करण्यासाठी ठेकेदार लॉबी व भ्रष्ट अधिकारी यांची युती सर्वपक्षीय नेत्यांच्या दारोदारी भेटीगाठी देत आहे. सर्वसामान्यांच्या खिशातून करस्वरूपातून आलेला शासन निधी चांगल्या पद्धतीने वापर व्हावा अशी सर्वसामान्य ग्रामस्थांची अपेक्षा असून अशा प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या दडपशाहीने बदलीचा प्रयत्न झाल्यास त्या ठेकेदारांच्या कामांची ओळख करणार असा इशारा मनसेचे माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिला आहे.