इच्छेनुसार मुंबई येथे करण्यात आले देहदान
सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला एक आगळीवेगळी ओळख निर्माण करून देणारे व ‘मामाचा गाव’ ही संकल्पना राबविणारे पर्यटन क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व ध्रुव कुमार तथा डी. के. सावंत (रा. माजगांव, मूळ रा. बांदा) यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी पहाटे मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या इच्छेप्रमाणे मुंबई येथे त्यांचे देहदान करण्यात येणार आहे.
बांदा डिंगणे येथील पटेकर सावंत कुटुंबीयात जन्मलेले डि. के. इतर युवकांप्रमाणेच शिक्षणानंतर नोकरीसाठी मुंबईत गेले. तेथे सुरुवातीला एका बँकेत त्यांनी नोकरी केली. मात्र त्यानंतर तिथे जास्त काळ न राहता ते एका मल्टिनॅशनल कंपनीत नोकरीला राहिले. काही काळ त्यांनी मंत्रालयात कॅन्टीनही चालवले होते. त्यानंतर ते गावी परतले व माजगाव येथील मळगाव घाटीच्या (मेटाच्या) वरच्या भागात निर्जन स्थळी डी. के. टुरिझम हा अनोखा असा पर्यटन प्रकल्प साकारला. हा प्रकल्प साकारत असताना अनेकांनी त्यांना अक्षरशः वेड्यात काढते. मात्र, जिद्द चिकाटी परिश्रम व घेतलेल्या ध्यास याच्या बळावर त्यांनी हा प्रकल्प यशस्वी करून दाखवता. त्यानंतर मामाचा गाव ही संकल्पना राबवून देश-विदेशातील पर्यटकांना कोकणातील अस्सल पर्यटन घडवून आणले. दाभिळ व डिंगणे मामाचा गाव ही संकल्पना राबवून त्यांनी कोकणच्या पर्यटनाला वेगळी ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न केला. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना ही विविध सेवा मिळवून देण्यासाठी ते नेहमी झटत होते.
सडेतोड स्वभाव व भ्रष्टाचार विरोधातील त्यांचा लढा सर्वांनाच परिचित होता. पर्यटन क्षेत्रात चाललेला भ्रष्टाचार त्यांनी अनेक वेळा उघड केला होता. त्या विरोधात त्यांनी नेहमीच आपली परखड भूमिका वेळोवेळी मांडली होती. कॅन्सर सारख्या मोठ्या आजाराला लढा देत ते भ्रष्टाचारा विरोधातही मोठा लढा देत होते. तसेच सिंधुदुर्गच्या पर्यटनासाठी त्यांचे मोठे योगदान राहिले होते. त्यांच्या निधनामुळे सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत आहे. पर्यटन क्षेत्रातील एक मोठा मार्गदर्शक हरपला अशा शब्दात अनेकांनी त्यांच्या प्रति आदरांजली वाहिली आहे.