दिव्यांग बांधवांच्या विविध समस्यांसंदर्भात देण्यात आले निवेदन
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल या संस्थेच्या वतीने संस्थेच्या शिष्टमंडळाने जिल्हा शल्यचिकित्सक सिव्हील सर्जन यांची भेट घेऊन त्यांना दिव्यांग बांधवांच्या समस्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले. निवेदनातील विषय पुढीलप्रमाणे होते:
दिव्यांग बांधवांसाठी ऑनलाईन प्रमाणपत्र व स्वावलंबन कार्ड शिबिर, जुने दिव्यांग प्रमाणपत्र 40 टक्के असेल तर त्याच टक्केवारीनुसार नवीन दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाईन करून मिळावे, एका डोळ्यासाठी अंध व्यक्तीला दिव्यांग प्रमाणपत्र मिळावे, UD ID कार्ड मिळण्यास विलंब होतो तरी ते लवकरात लवकर मिळावे, केस पेपर काढतात ती खिडकी दिव्यांग बांधवांच्या सोईनुसार करण्यात यावी, जिल्हा सामान्य रूग्णालय ओरोस व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र ओरोसच्या माध्यमातून गरजू दिव्यांग बांधवांना साधने वाटप केली जातात त्यात उत्पन्न दाखल्याची अट शिथिल करावी (शासकिय कर्मचारी सोडून) या मागण्यांसंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन देण्यात आले. यावर त्यांनी योग्य ते सहकार्य करू, असे आश्वासन दिले. यावेळी साईकृपा संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे, सामाजिक कार्यकर्ते प्रसन्न देसाई, शामसुंदर लोट, दिक्षा तेली, स्वाती राऊळ, प्रशांत केळुस्कर, प्रकाश वाघ, निलम राणे आदी मान्यवर उपस्थित होते.