ब्युरो न्यूज (सिंधुदुर्ग) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नारायण राणे विजयी झाले आहेत. नारायण राणे यांना 4 लाख 48 हजार 514 मते मिळाली. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विनायक राऊत यांना 4 लाख 656 मते मिळाली. नारायण राणेंनी जवळपास 47 हजारांहून अधिक मताधिक्य मिळवून विनायक राऊतांवर विजय मिळवला. विनायक राऊत यांच्या पराभवाबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी जाहीररित्या माफी मागितली.
लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या पराभवानंतर मालवणमध्ये महाविकासआघाडीची चिंतन बैठक पार पडली. या बैठकीत पदाधिकारी – कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी जाहीर माफी मागितली आहे. या बैठकीत भाषण करताना आमदार वैभव नाईक यांनी विनायक राऊत यांची माफी मागितली. वैभव नाईक हे कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार आहे. हा मतदारसंघ वैभव नाईक यांचा गड म्हणून ओळखला जातो. मात्र लोकसभा निवडणुकीत कुडाळ – मालवण मतदारसंघात विनायक राऊत यांना अपेक्षेपेक्षा कमी मत मिळाली. विशेष म्हणजे याच मतदारसंघातून नारायण राणेंना लीड मिळालं. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांच्यावर जोरदार टीका होत होती. यामुळे शिवसैनिकांसह अनेकांना आश्चर्याचा धक्का मिळाला होता. अशातच आता पार पडलेल्या बैठकीत विनायक राऊत यांची उपस्थिती पाहून वैभव नाईक यांनी त्यांची जाहीरपणे माफी मागितली आहे.