सावंतवाडी आठवडा बाजारातील फिरत्या विक्रेत्यांचे हॉकर्स फेडरेशन च्या नेतृत्वाखाली पालिका प्रशासनाला निवेदन
सावंतवाडी (प्रतिनिधी) : शहरात भरविल्या जाणाऱ्या आठवडा बाजाराची जागा वारंवार बदलली जात असल्याने त्याचा नाहक त्रास फिरत्या व्यापाऱ्यांना होत आहे. आम्हाला विश्वासात न घेता हे परस्पर निर्णय घेतले जात आहेत, असा आरोप करत येथील हॉकर्स संघटनेच्या नेतृत्वाखाली फिरत्या विक्रेत्यांनी पालिकेवर मोर्चा काढला. यावेळी ग्राहकांना सोयीचे होईल अशाच ठिकाणी आठवडा बाजाराची जागा निश्चित करा, तसेच होळीचा खुंट परिसरातील जागा गैरसोयीची आहे त्यामुळे त्या ठिकाणी बाजार हलवू नका, तर यासंदर्भात कोणताही निर्णय घेताना आम्हा फिरत्या विक्रेत्यांना सुद्धा विश्वासात घ्या, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली.
दरम्यान फिरत्या विक्रेत्यामुळे दैनंदिन व्यापार मंदावले, असा आरोप येथील व्यापारी संघटनांकडून होत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून फिरत्या विक्रेत्यांना विक्री करण्यासंदर्भात निर्बंध घातले जात आहेत. ही त्या गरीब व्यापाऱ्यांची गळचेपी आहे, अशी नाराजी सिंधुदुर्ग हॉकर्स फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप निंबाळकर यांनी व्यक्त केली. याबाबतच्या विविध मागण्यासंदर्भात पालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा हॉकर्स फेडरेशन सचिव महेश परूळेकर, नाजिम पटेल, राजेंद्र लेंडगे, संदीप गौंड, इरसाद मालदार, सुमन वाडीकर, सुभाष चव्हाण, विजय लोके, प्रकाश वाघरी, श्रीकांत सोलापूर, विजय गुजराती, चमन सोलंकी, कलाम अंसारी, जहीर शेख, लक्ष्मण राठोड, यशवंत बेळगावकर, अर्जुन सोलंकी, लक्ष्मण रोठोड, शंकर चव्हाण, अर्जुन चव्हाण, सुरेश चव्हाण, माजिद शेख, धीरजू आबणावे, गुंडू चव्हाण, राम शर्मा, सुलभा चौधरी, रुक्मिणी बेळगावकर, लक्ष्मीबाई रोठोड, इब्राहिम नाईकवाडी, नीतु तुपकर, दीपक तुपकर, हिराबाई चव्हाण, रीना भारती आदींसह मोठ्या संख्येने फिरते व्यापारी उपस्थित होते.
त्यांनी दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, सावंतवाडी आठवडा बाजाराची जागा आतापर्यंत चार वेळा बदलण्यात आली आहे. मात्र हे निर्णय होत असताना आम्हा विक्रेत्यांना पालिका प्रशासनाने विचारात घेतले नाही. सद्यस्थितीत तलावाकाठी भरवी ला जाणारा आठवडा बाजार होळीचा खुंट परिसरात नेण्यासाठीची चर्चा सुरू आहे.
मात्र ती जागा ग्राहकांच्या दृष्टीने गैरसोयीची आहे. त्या ठिकाणी वाहतुकीचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. तसेच व्यापाऱ्यांसाठी सुद्धा जागा अपुरी पडू शकते. त्यामुळे त्या ठिकाणी आठवडा बाजारासाठी जागा निश्चित केली जाऊ नये. तसेच आठवडा बाजारासंदर्भातील कोणताही निर्णय घेताना आम्हा व्यापाऱ्यांना विश्वासात घ्यावे. त्यासाठी आयोजित बैठकांमध्ये आम्हालाही बोलविण्यात यावे, अशी मागणी उपस्थितांकडून करण्यात आली. तर अलीकडेच व्यापाऱ्यांकडून जादा रक्कम घेऊन कमी किमतीची पावती केली जात आहे, अशी चर्चा सुरू आहे. त्या संदर्भात सुद्धा संबंधितावर तात्काळ योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा पवित्रा हाती घ्यावा लागेल, असा इशारा देण्यात आला.