खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सन २०२३ -२४ या शैशणिक वर्षात १० वी बोर्ड परीक्षेत खारेपाटण हायस्कूल मधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम शाळेचे उच्चश्रेणी मुख्यद्यापक प्रदीप श्रावणकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच शाळेत संपन्न झाला.
या कार्यक्रमाला खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य गुरुप्रसाद शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष प्राप्ती कट्टी, माजी अध्यक्ष संतोष पाटणकर माता पालक संघाच्या उपाध्यक्ष प्रियंका गुरव, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे,समिती सदस्य मनोज करंदीकर,संध्या पोरे, प्राची नानिवडेकर,आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
यंदाच्या १० वी बोर्ड परीक्षेत जि.प.केंद्र शाळा खारेपाटण न.१ चे माजी विद्यार्थी खारेपाटण हायस्कूल मध्ये गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल शाळेच्या वतीने सदर विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.खारेपाटण हायस्कूल मध्ये १० वी बोर्ड परीक्षेत प्रथम आलेली ऋतुजा मनोज करंदीकर व द्वितीय क्रमांक प्राप्त साची सचिन पारकर तर तृतीय क्रमांक मिळविलेला विद्यार्थी दुर्वेश प्रकाश नानिवडेकर या विद्यार्थ्यांचा शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच खारेपाटण ग्रा.पं.सदस्य यांच्या सौजन्याने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांचा देखील शाळेच्या वतीने गौरव करण्यात आला.
सन २०२०- २१ या शैशणिक वर्षातील खारेपाटण जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा नं.१ येथून इयत्ता ७ वी पास होऊन पुढील शिक्षणासाठी खारेपाटण हायस्कूल मध्ये दाखल झालेल्या या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी खारेपाटण हायस्कूल मध्ये प्रथम क्रमांकानी उत्तीर्ण होऊन आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. यामुळे खारेपाटण जि.प.केंद्र शाळेच्या शिक्षक व समिती सदस्य व पलकानी घेतलेल्या आजपर्यंतच्या मेहनतीचे चीज झाले असून या विद्यार्थ्यांचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे भावपूर्ण उदगार खारेपाटण जि.प.केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काढले. यावेळी शाळेच्या अध्यक्ष प्राप्ती कट्टी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर सर यांनी केले.तर सर्वांचे आभार शाळेच्या शिक्षिका रुपाली पारकर यांनी मानले.