सिंधुदुर्ग जिह्यातील वाडीजोड रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी द्या

आमदार नितेश राणे यांची अधिवेशनात मागणी

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : वाडीजोड रस्त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ४० कोटीचा निधी द्या, अशी मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार नितेश राणे यांनी केली आहे. आ. राणे यांच्या मागणीनंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी वाडीजोड रस्त्यासाठी लवकरच निधीची तरतूद केली जाईल असे आश्वासन दिले आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी कणकवली, देवगड व वैभववाडीचे आमदार नितेश राणे यांनी कोकणातील प्रलंबित विकास कामाबाबत अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले. मागील सात महिन्यात विविध विकास कामांसाठी सरकारने निधी दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन ही केले. शिंदे – फडणवीस सरकारने मागील सात महिन्यात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकास कामासाठी भरघोस निधी दिला आहे.

केंद्र शासनाने तर तरळे – गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गाला तब्बल २५० कोटीचा निधी दिला आहे. सदर काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लागणार आहे. केंद्र शासनाचे त्यांनी आभार मानले.

पुढे बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, मंत्री महोदय हे कोकणातीलच आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाडीजोड रस्त्याच्या अनेक अडचणी कोकणवासीयांना भेडसावत आहेत. त्यामुळे सहानुभूतीपूर्वक विचार करून वाडीजोड रस्त्यासाठी ४० कोटीचा निधी मिळावा अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनात केली. मागील अडीच वर्ष सत्तेवर असलेल्या सरकारने सातत्याने कोकणावर अन्याय केला. विकास कामाला निधी दिला नाही. असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!