लाईनमन दिनानिमित्त माजी खास. निलेश राणे यांनी वीज कर्मचाऱ्यांना दिल्या शुभेच्छा
ओरोस (प्रतिनिधी) : लाईनमन हा महावितरणच्या वीज वितरण व्यवस्थेमधील अत्यंत महत्वाचा घटक. महावितरणचे लाईनमन ऊन, वारा, पाऊस तसेच इतर अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी चोवीस तास सेवा देतात. या लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी इथे आलो आहे, आपण सिंधुदुर्ग जिल्हा वासियांना नियमित सुरळीत सेवा देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे व लाईनमन दिनानिमित्त आपल्याला शुभेच्छा देतो, अशा भावना आज शनिवारी माजी खासदार व भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांनी ओरोस महावितरण कार्यालय येथे व्यक्त केल्या.
विजेच्या एका बटणामागे विस्तारलेल्या प्रचंड मोठ्या वीजयंत्रणेत अदृश्य असलेल्या विजेला सुरळीत ठेवण्यासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या वीजक्षेत्रातील महिला व पुरुष तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अर्थात लाईनमनचा गौरव करण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आज 4 मार्च हा दिवस ‘लाईनमन दिन’ म्हणून ओरोस महावितरण कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, आनंद शिरवलकर, श्रीपाद तवटे, देवेन सामंत, योगेश घाडी, आबा सावंत, मनोरंजन सावंत, साई दळवी, तुषार सावंत आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.