सावंतवाडी (प्रतिनिधी) : काम सुरू असलेल्या विहिरीत कोसळल्यामुळे निरवडे भंडारवाडी येथील ९ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्घटना आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. त्याला अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु तो तत्पुर्वीच मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकारी तथा बालरोग तज्ञ डॉ. संदीप सावंत यांनी सांगितले. आरव जानू खरात, असे त्याचे नाव आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरव हा सकाळी शाळेतून घरी आला. त्यानंतर घरात दप्तर ठेवून आईला खेळायला जातो असे सांगून निघून गेला. यावेळी घरापासून काही अंतरावर विहीर खोदायीचे काम सुरू असलेल्या ठिकाणावरून जात असताना तो पाय घसरून विहिरीत कोसळला. दरम्यान त्याच्यासोबत असलेले सहकारी ही घटना सांगण्यासाठी त्याच्या घरी धावून गेले. यावेळी घरातील व्यक्ती त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत त्याचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याला तात्काळ निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र अधिक उपचारासाठी त्याला उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिला. त्यानुसार त्याला उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.