कणकवली उपजिल्हा रुग्णालयासह वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर सोमवारी होणार हजर
कणकवली(प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून कणकवली उपजिल्हा रुग्णालयासह वैभववाडी रुग्णालयात सोमवार 6 मार्चपासून डॉक्टर उपलब्ध होणार आहेत. सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय उपचार सुविधा पुरविणारे कणकवली उपजिल्हा रुग्णालय आणि वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर पदे रिक्त असल्यामुळे खेड्यातील गरजू रुग्णांची गैरसोय होत होती.आमदार नितेश राणे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे रिक्त वैद्यकीय अधिकारी पदे भरण्याबाबत मागणी केली होती. आमदार नितेश राणे यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत कणकवली उपजिल्हा रुग्णालय आणि वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रेडिओलॉजिस्ट डॉ सतीश पवार आणि डॉ ऐश्वर्य शेळके सोमवार 6 मार्च रोजी रुग्णसेवेत दाखल होणार आहेत. तर वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात डॉ धर्मेश हे रुजू झाले असून डॉ कदम हे रुजू होणार आहेत. आणखी 4 वैद्यकीय अधिकारी येत्या 8 दिवसांत नियुक्त केले जाणार असून त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची होणारी आबाळ दूर होणार आहे.