अनेक कॉजवे पाण्याखाली
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात रविवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत होता. तालुक्यातील नदी नाल्याना पुर आला आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक कॉजवे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. मात्र रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे नोकरदार व विधार्त्यांना याचा त्रास झाला नाही. दिवसभर सारखा वीज पुरवठा खंडित होत होता. भुईबावडा घाटातून सायंकाळी उशिरापर्यंत वाहतूक सुरु होती. तर उशिरापर्यंत कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची नोंद नव्हती.
गेले आठ दिवस सर्वत्र पावसाची संततधार सुरु आहे. शनिवार रात्रीपासून तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. तर रविवारी सकाळ पासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाने एडगाव रामेश्वरवाडी येथील कॉजवे पाण्याखाली गेला आहे. तसेच तिरवडे तर्फ खारेपाटण येथील कॉजवे पाण्याखाली गेला आहे. मात्र या पावसाने तालुक्यात कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची नोंद नाही.तालुक्यात भात लावणी अंतिम टप्प्यात आहे. तर नाचणी लावणीचे काम जोरदार पावसामुळे रखडले आहे.











