शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातच प्राथमिक शाळांची दुरावस्था ही लाजिरवाणी बाब
चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा काळसे धामापूर या शाळेच्या इमारतीचे छप्पर ठिकठिकाणी मोडकळीस आल्यामुळे सध्याच्या मुसळधार पावसात संपूर्ण छपराला ठिकठिकाणी गळती होत असून विद्यार्थी बसत असलेल्या वर्गखोलीत पाणी गळत आहे. विशेष म्हणजे वर्गाच्या प्रवेशद्वारावरच मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्याने मुले फरशीवर घसरून पडण्याचे प्रकार घडत आहेत. यापासून बचाव व्हावा म्हणून विद्यार्थीच वर्गात ठिकठिकाणी भांडी लावून ठेवत आहेत आणि भितीच्या छायेखाली अभ्यासाचे धडे गिरवत आहेत. या बरोबरच शाळेच्या इतर वर्गांमध्ये तर पावसाचे पाणी गळून तळे साचत आहे. दोन दिवसांपुर्वी आलेल्या वादळी वाऱ्याने छपरावरील पत्रा वाऱ्याने उडून बाजूला गेला आहे.
त्यामुळेही इमारतीत गळती अजूनच वाढली आहे. वारंवार दुरुस्तीचा प्रस्ताव देउनही शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी सर्व माहिती असूनही झोपेच सोंग घेतल्याप्रमाणे काळसे धामापूर शाळेच्या दुरवस्थेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत का ? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री असलेल्या दिपक केसरकर यांच्या जिल्ह्यातच प्राथमिक शाळांची ही दुरवस्था होणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे अशी प्रतिक्रियाही पालकांनी व्यक्त केली आहे.
सदर इमारत जुनी असून या इमारतीची दुरुस्ती व्हावी यासाठी यापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीने वारंवार छप्पर दुरुस्तीसाठी प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवले होते परंतु त्याला अद्यापपर्यंत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळेही पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा वाचवण्यासाठी पालकांना त्यांच्या मुलांना शहरात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत न घालता स्थानिक प्राथमिक शाळेत घालण्यासाठी आवाहन करायच आणि दुसरीकडे मात्र विद्यार्थ्यांना आणि पालकांना अपेक्षित सुविधा आणि अनुभवी शिक्षक नाही द्यायचा अशी जि. प. प्राथमिक शिक्षण विभागाचा उदासीन कारभार सुरू आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होण्यास आणि शाळांचे अस्तीत्व धोक्यात येण्यास खऱ्या अर्थाने उदासीन प्रशासनच जबाबदार आहे हे या दुरवस्थेवरुन अधोरेखित झाले आहे.
त्यामुळे मालवण तालुका गटशिक्षणाधिकारी यांनी तातडीने काळसे धामापूर प्राथमिक शाळेला भेट देउन दुरवस्थेची पाहणी करावी आणि लगेच उपाययोजना करावी. अशी मागणी या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे. यावेळी पालकांच्या मागणीस प्रतिसाद न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही पालकांनी दिला आहे.












