अभियांत्रिकी व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणारा मराठा आरक्षण मिळालेला विद्यार्थी शैक्षणिक लाभापासून वंचित राहण्याची शक्यता
ऑफलाईन अर्ज घेण्याची पालक व विद्यार्थ्यांची केलेली मागणी जात पडताळणी विभागाने फेटाळली
जात पडताळणी प्रमाणपत्र अर्जाच्या पावतीची अट शिथिल करण्याची आवश्यकता
वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले तीन दिवस जात पडताळणी वेबसाईट बंद आहे. अभियांत्रिकी व वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची शेवटची तारीख दिनांक २४-०७-२०२४ संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच आहे. वैभववाडीत मराठा आरक्षणाचा लाभ मिळालेल्या मुलांची जात प्रमाणपत्रे आज तयार झाली परंतु जात प्रमाणपत्राची वेबसाईट बंद असल्याने जातपडताळणी प्रमाणपत्राचे ऑनलाईन अर्ज झाल्याशिवाय प्रवेश फॉर्म आरक्षणातून भरता येणार नाही हे लक्षात येताच वैभववाडीतील सर्व पालकांनी आज जात पडताळणी विभागाला ऑफलाईन अर्ज घेण्याची विनंती केली परंतु जात पडताळणी विभागाने ती फेटाळून लावली. ऑनलाईन अर्ज घेऊन या म्हणून सांगितले. तसेच शासनाने आज सदर विद्यार्थांना जातपडताळणी अर्ज ऑनलाईन सादर करण्यास सहा महिन्यांचा कालावधी वाढवून दिल्याचे एक परिपत्रक निर्गमित केले आहे. परंतु अभियांत्रिकी व वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरताना ऑनलाईन प्रवेशावेळी जात पडताळणी प्रमाणपत्राबाबतची अर्जाची पावती अपलोड करावी लागत आहे त्यामुळे त्या पावतीची अट देखील शिथिल करणे गरजेचे आहे. अन्यथा सहा महिन्यांचा कालावधी वाढवून देवून देखील उपयोग न होता लाभार्थी विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून अर्ज भरावे लागून शैक्षणिक लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.