आचरा (प्रतिनिधी) : लब्देवाडी येथील महेंद्र यशवंत नाटेकर यांच्या चालत्या व्हॅगनार कारला (एम. एच. ०१, ईई ०३१७) शनिवारी पहाटे ४ वा. च्या सुमारास अचानक आग लागून कार आगीत पूर्णतः जळाली. ही घटना मशवी तिठा ते नारिंग्रे या मार्गावर घडली. या घटनेत नाटेकर हे सुदैवाने बचावले. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री. नाटेकर हे आपल्या ताब्यातील व्हॅगनार कारने शनिवारी पहाटे ४ वा. च्या सुमारास मुंबई येथे निघाले होते. त्यांची कार मशवी तिठा ते नारिंग्रे या मार्गावर आली असता कारच्या पुढील भागातून आगीच्या ठिणग्या उडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ते तात्काळ कारमधून खाली उतरले. मात्र याचदरम्यान गाडीने पेट घेतला. या घटनेत श्री. नाटेकर हे सुदैवाने बचावले. या घटनेची फिर्याद श्री. नाटेकर यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम करीत आहेत.











