बांधकाम विभागाकडून टेंडर मॅनेज ; शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांचा आरोप

कणकवली (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हापरिषद बांधकाम विभागा मार्फत काढण्यात आलेल्या निविदा ओपन करताना मॅनेज करण्याचा प्रकार पुढे आलेला आहे. एकाच निविदेतील दोन वेगवेगळ्या कामांसाठी एकच ठेकेदार किंवा संस्था एका कामाला पात्र ठरते तर दुसऱ्या कामाला कागदपत्राअभावी अपात्र ठरते हे कसे काय होऊ शकते? या निविदा नुसार सर्व प्रक्रिया स्पर्धात्मक दृष्ट्या होणे आवश्यक असताना ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हापरिषद बांधकाम विभाग अधिकारी संगणमताने निविदा मॅनेज करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांनी केला आहे.

पारकर यांनी म्हटले आहे की याबाबत उदाहरण द्यावयाचे झाल्यास एकाच वेळी काढण्यात आलेल्या निवेदन पैकी कनेडी गावातील कामासाठी एखादा ठेकेदार किंवा संस्था पात्र ठरते. पण तीच संस्था किंवा ठेकेदार हळवल गावा मधील कामासाठी कागदपत्रात अभावी अपात्र ठरते. अशा संस्थेचे किंवा ठेकेदाराचे कागदपत्र अपूर्ण असतील तर नियमानुसार संबंधित अधिकाऱ्याने त्यांच्याकडून कागदपत्र पूर्ण करून घेण्याची गरज असते. मात्र येथे काही वेळा जाणीवपूर्वक कागदपत्र अपूर्ण ठेवले जातात किंवा अपूर्ण असल्याचे कारण दाखवून निविदा ओपन केली जात नाही. मात्र हा प्रकार म्हणजे पद्धतशीरपणे ती ती कामे मॅनेज करण्याचाच आहे. गेल्या काही कालावधीत अशाप्रकारे अनेक कामे मॅनेज करून शासनाचेही नुकसान करण्यात आलेले आहे. कोणत्याही कामासाठी स्पर्धात्मक पद्धतीने निविदा भरली गेल्यास व त्या ओपन करताना स्पर्धात्मक पद्धतीनेच झाल्यास कामे ही दर्जेदार होतात. मात्र या ठिकाणी अधिकारीच ठेकेदारांशी संगणमत करून निविदा मॅनेज करत आहेत.

अलीकडेच जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील काही कामांसाठीच्या निविदा काढण्यात आलेल्या आहेत. येत्या दोन-तीन दिवसात या निविदा ओपन करण्यात येणार आहेत. या निविदा ओपन करताना नियमानुसार कार्यवाही होणे अपेक्षित आहे. जाणीवपूर्वक कागदपत्र अपूर्ण ठेवणे किंवा ठेवण्यास भाग पाडून निविदा मॅनेज करण्याचा प्रकार घडल्यास त्या ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाका अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही असा इशाराही श्री पारकर यांनी दिला आहे.

error: Content is protected !!