मानव संसाधन विकास संस्था अध्यक्षा उमा प्रभू यांचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराचे उत्तम प्रकारे प्रशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. प्रशिक्षनातून परिवर्तन झाले पाहिजे. या दृष्टीने प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत. असे प्रतिपादन मानव संसाधन विकास संस्थेच्या अध्यक्षा उमा प्रभू यांनी केले.
सिंधुदुर्गनगरी येथे जनशिक्षण संस्थेच्या कार्यालयात आज महिला दिना निमित्त क्षमता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मानव संसाधन विकास संस्थेच्या अध्यक्षा उमा प्रभू यांच्या हस्ते तर जन शिक्षण संस्था सिंधुदुर्ग चे अध्यक्ष डॉ शरद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
यावेळी प्रमुख पाहुणे लुपिन फाउंडेशन व्यवस्थापकीय कमिटी सदस्य योगेश प्रभू, सौ यशस्वी सावंत ,संचालक सुधीर पालव आदींसह प्रशिक्षणार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमाकांत मेस्त्री यांनी केले तर प्रास्ताविक सुधीर पालव यांनी केले. यावेळी क्षमता विकास कार्यक्रम, व शिक्षण संस्थेच्या विविध उपक्रमा बाबत पालव यांनी माहिती दिली. ग्रामीण भागातील महिलाना आर्थिक उन्नत करण्यासाठी, आत्मनिर्भर करण्यासाठी जनशिक्षण संस्थाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटक मानव संसाधन विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ उमा प्रभू म्हणाल्या मानव विकास संस्था संचलित जनशिक्षण संस्थेच्या वतीने महिलांना विविध प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनविण्याचा हा कार्यक्रम असून संस्थेच्या माध्यमातून महिला सबलीकरण आणि महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले आहेत. ग्रामीण भागातील महिलांमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या परिवर्तनातून सुजलाम सुफलाम ग्रामीण भाग आणि जिल्हा व्हावा यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन विविध उपक्रम राबविले जात आहेत. स्त्री ही बायको, आई ,बहीण, मुलगी या नात्याने विविध रूपाने संबोधली जाते. तिच्यामध्ये असलेला न्यूनगंड घालउन एक आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. या हेतूने प्रशिक्षण देणाऱ्या महिलांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे.त्याचा महिलांनी फायदा घ्यावा. असे आवाहनही सौ उमा प्रभू यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शरद सावंत म्हणाले आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठ कशी निर्माण करावी याबाबत जनशिक्षण मार्फत केंद्र शासनाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत .फूड प्रोसेसिंग सारख्या तंत्रज्ञानातून जिल्ह्यात ११ प्रशिक्षण ग्रुप उभे केले आहेत. २५ टक्के लोक स्वतःच्या पायावर आज रोजगार करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०० पुरुषामागे १०७ महिला हे प्रमाण असून देशात आणि राज्यातही त्याचप्रमाणे प्रमाण वाढत आहे. मानव विकास संस्थेच्या माध्यमातून आर्थिक रोजगार निर्मितीवर भर दिला असून जिल्ह्यात राज्यात परिवर्तन केंद्र सुरू केली आहेत. पांग्रड सारख्या काही गावात नाबार्डच्या माध्यमातून गट उभे केले जात आहेत प्रशिक्षकांनी याबाबत मार्गदर्शन केले पाहिजे
यावेळी लुपिन फाउंडेशन चे योगेश प्रभू म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर येथील कच्च्या मालावर विविध प्रोसेसिंग युनिट तयार झाले पाहिजेत . त्यासाठी गावागावात असे प्रशिक्षण कार्यक्रम रोजगार विषयक उपक्रम राबवा.
असे आवाहनही त्यांनी केले .शेवटी उपस्थितांचे आभार रमेश खरात यांनी मानले.