विनयशील व्यक्तिमत्त्व : विनय पावसकर
तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे गावचे माजी सरपंच, तळेरे आदर्श व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष, सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव आणि सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम करताना ज्यांनी नेहमीच परोपकारी वृत्ती दाखवत माणुसकी जिवंत ठेवली असे विनय केशव पावसकर यांचे २१ जुलै २०२४ रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांच्याविषयी श्रद्धांजली लेख…
एखाद्या माणसाला आपल्या गावची ओढ किती स्वस्थ बसू देत नाही, हे अनेकदा विनय पावसकर यांच्याकडे पाहिल्यानंतर समजून यायचे. ५४ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या व्यक्तिमत्त्वाने अर्धेअधिक आयुष्य सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यासाठी खर्च केले. आपल्या गावच्या अनेक उपक्रमांत ते आवर्जून सहभागी व्हायचे.विनय पावसकर यांनी सुरुवातीला तळेरे येथे खासगी शिकवणीला सुरुवात केली. १९९४ साली एम. कॉम. पूर्ण करून १९९५ पासून तळेरे येथे खासगी शिकवणी वर्ग घेऊ लागले. १९९७ साली तळेरे येथेच करविषयक सल्ला देण्याचा व्यवसाय सुरू केला. दरम्यान, १९९७-९८ साली तळेरे गावच्या सरपंचपदी त्यांची निवड झाली आणि राजकीय क्षेत्रातही त्यांचे अनेक परममित्र बनले. तिथेही त्यांनी आपल्या कार्याची झलक दाखवली.
तळेरे येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील तळेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने २६ नोव्हेंबर १९९७ रोजी सुरू झालेल्या सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टचे प्रारंभापासून पावसकर सचिव म्हणून कार्यरत होते. खरे तर सुनील तळेकर यांच्यासोबत राहून त्यांच्याच तालमीत तयार झालेले विनय पावसकर यांनी आपल्या आयुष्यातील अर्धेअधिक आयुष्य सामूहिक आणि वैयक्तिक सामाजिक कार्यासाठी वाहून घेतले.दरम्यान, विनय पावसकर यांचे विविध सामाजिक कार्य पाहून नेहरू युवा केंद्राचा जिल्हास्तरीय युवा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. तर, सन २००० मध्ये सुरेश प्रभू यांच्या मानव संसाधन विकास मंडळ परिवर्तन योजनेचे केंद्र ट्रस्टला मिळाले होते. त्यांच्याच निधीतून व्यायामशाळा सुरू करण्यात आली होती. त्यातही पावसकर यांचा मोलाचा वाटा होता. १९९२ साली पुन्हा नव्याने सुरू केलेल्या गांगेश्वर प्रासादिक नाट्य मंडळ तसेच श्री गांगेश्वर क्रीडा मंडळाचे पदाधिकारी म्हणूनही त्यांनी यशस्वी कामगिरी बजावली होती.
विनय पावसकर यांचा अत्यंत विनम्र, विनयशील आणि आपलेपणा वाटेल असा आपुलकीचा स्वभाव पाहून लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वचजणांना ते आपलेसे वाटायचे. सामाजिक दातृत्व किती दूरदृष्टीचे असू शकते याबाबत त्यांनी वस्तुपाठ घालून दिला. तळेरे पंचक्रोशीतील गरजू आणि ज्यांना तीर्थक्षेत्री जायला शक्य होत नाही, अशा अनेक ज्येष्ठ नागरिकांना स्वखर्चाने अनेक तीर्थस्थानांचे दर्शन घडवून आणण्याचे पुण्याचे काम त्यांनी केले. गरजवंताला सढळ हस्ते मदत करण्याची त्यांची वृत्ती आजही अनेकांना भावूक करते.
विनय पावसकर हे कुटुंबवत्सल होते. तसेच, ते मैत्रीसाठी जीव देणारे जिवलग मित्र होते. त्यामुळेच, त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे कुटुंब, त्यांचा मित्र परिवार आणि त्यांना ओळखणारे सर्वच हळहळले. विनय पावसकर यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना…निकेत पावसकर, तळेरे
दिल, दोस्ती, दुनियादारी
विनय पावसकर यांचा मोठा आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील मित्र परिवार आहे. आपल्या मित्रांमध्ये विनय हे अत्यंत उत्साही, मॅनेजमेंट गुरू आणि दिलदार मित्र म्हणून परिचित होते. म्हणूनच त्यांच्या निधनानंतर अनेक मित्रांना डोळ्यांतील अश्रू अनावर झाले.
अर्धे आयुष्य सामाजिक कामासाठी
१९९७ पासून तळेरे येथील सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिव पदाची यशस्वी धुरा त्यांनी स्थापनेपासून २७ वर्षे सांभाळली. आपल्या आयुष्याच्या अर्धेअधिक आयुष्य त्यांनी या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक कामांसाठी व्यतित केले. या दरम्यान अनेकांच्या सहकार्याने त्यांनी अनेक उपक्रम आणि शिबिरे अत्यंत नियोजनरीत्या आयोजित करून यशस्वीही केली.
अन् तळेरे आदर्श व्यापारी संघटना झाली
विनय पावसकर तळेरे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष असतानाच या संघटनेला जिल्हा व्यापारी संघाचा पहिला आदर्श व्यापारी संघटना पुरस्कार मिळाला त्यानंतर ‘तळेरे आदर्श व्यापारी संघटना’ झाली.
वाचनालयाची स्वत: ची इमारत स्वप्न
सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाची स्वतः ची इमारत व्हावी, अशी प्रचंड इच्छा विनय पावसकर यांची होती. त्यादृष्टीने गेल्यावर्षी इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. तर त्यादृष्टीने पावसकर यांनी पावले टाकली होती. त्यांचे ते अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार तळेरे येथे आयोजित केलेल्या शोकसभेत सर्व संघटना पदाधिकारी आणि विनय पावसकर मित्र परिवार यांनी केला आहे.
सर्वांना हवाहवासा विनू
विनय पावसकर यांचा स्वभावच एवढा लाघवी होता की ते कोणाशीही मिळून मिसळून रमायचे. अगदी अनेकजण त्यांना विनू याच नावाने ओळखायचे आणि हाक द्यायचे.