सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी न्यायाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या तिन्ही विधानसभा मतदार संघाच्या जनता दरबारात एकूण ११४७ प्रश्न आले. त्यातील ५२१ प्रश्न जागीच सोडविले गेले. शिल्लक राहिलेले प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाला टाईम बाँड देण्यात आला आहे. त्यामुळे याचा रिव्हू घेण्यासाठी २५ ते २७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तिन्ही मतदार संघासाठी स्वतंत्र आयोजित केलेल्या जनता दरबाराचे बुधवारी सावंतवाडी विधानसभेच्या जनता दरबाराच्या आयोजनाने समारोप झाला. यानंतर पत्रकार परिषद घेत मंत्री चव्हाण यांनी माहिती दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राजन तेली, संजू परब, विशाल परब, मनोज नाईक, युवराज लखमराजे, दिलीप गिरप यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. जिल्हा पोलिस अधीक्षक अग्रवाल यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून आजच्या जनता दरबाराचा शुभारंभ करण्यात आला.