राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समिती अध्यक्ष राजन कोरगावकर सरचिटणीस सत्यवान माळवे यांची माहिती
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जुनी पेन्शन सुरू करावी या प्रमुख मागण्यांसह असंख्य प्रलंबित मागण्यासाठी शासकीय कर्मचारी १४ मार्च पासून संपावर जात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ५६ विभागातील १७ हजार कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीचे अध्यक्ष राजन कोरगावकर आणि सरचिटणीस सत्यवान माळवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्गनगरी येथील प्राथमिक शिक्षक पतपेढी सभागृहात १४ मार्च रोजीच्या संपाबाबत नियोजन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्य सरकारी कर्मचारी, निम सरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, नगरपालिका आणि नगर परिषद कर्मचारी, जिल्हा महसूल कर्मचारी, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघ, जिल्हा आरोग्य कर्मचारी संघटना, जिल्हा नर्सेस फेडरेशन, राज्य चतुर्थ श्रेणी कर्मचारी आदी संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.