सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित सिंधुदुर्गनगरी या संस्थेच्या वेंगुर्ला शाखेत अपहार केलेल्या तत्कालीन शाखाधिकारी यास संस्थेच्या सेवेतून कायमस्वरूपी काढून टाकण्यात आले असून तसा बडतर्फी आदेश बजावण्यात आला आहे. तसेच सदर कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांचेकडे संस्थेने केली आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष नारायण नाईक यांनी दिली आहे.
प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या वेंगुर्ला शाखेत कार्यरत असताना सन 2022 ते माहे मे 2024 या कालावधीत शाखाधिकारी म्हणून कार्यरत असताना सभासदांच्या कर्ज व ठेव खाती अफरातफर करून सुमारे ४५ लाखाचा अपहार केल्याचे वैधानिक लेखापरीक्षक यांच्या अंतिम अहवालावरून स्पष्ट झाल्याने १६ ऑगस्ट रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या तातडीच्या सभेत सदर कर्मचाऱ्यास बडतर्फ करून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा एकमुखी ठराव घेण्यात आला होता. त्यानुसार सदर कर्मचाऱ्यास संस्थेच्या सेवेतून कायमस्वरूपी काढून टाकण्यात आल्याचा आदेश मंगळवारी बजावण्यात आला. तसेच अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडे करण्यात आली.
वेंगुर्ला शाखेतील ज्या सभासदांच्या खात्यावर संबंधित शाखाधिकारी याने अनियमितता केली होती ती खाती नियमित करण्याचे काम सुरू असून बहुतांश सभासदांची खाती नियमित करण्यात आली आहेत. खाती नियमित झाल्याचे फोन संदेश प्राप्त होताच बहुतांश सभासदांनी पतपेढी संचालक यांचेकडे समाधान व्यक्त केले आहे.
जिल्हा उपनिबंधक सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या आदेशानुसार या प्रकरणी विशेष सर्वसाधारण सभा लावण्यासाठी संचालक मंडळाची तातडीची सभा आयोजित करण्यात येणार असून त्या सभेत नियम ७६ नुसार कार्यवाही करून विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात येणार आहे. तत्पूर्वी विशेष सर्वसाधारण सभा मागणी केलेल्या सभासदांच्या अर्जांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी संचालक मंडळाने आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या असून अपहार उघडकीस आल्यापासून अवघ्या महिन्याभराच्या आत सर्व कार्यवाही पूर्ण केल्याने सभासदांनी व्यक्तिशः समाधान व्यक्त केले आहे.