जबाबदार असणाऱ्या इतर अधिकारी यांचेवर गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन – शिवसेना उबाठा तालुका प्रमुख मंगेश लोके
वैभववाडी (प्रतिनिधी) : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचीघटना अत्यंत दुर्दैवी व संतापजनक आहे. सुमारे 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला सिंधुदुर्ग किल्ला आजही वादळ वारा, समुद्राच्या लाटा झेलत रुबाबात शिवरायांच्या कार्याची प्रचिती देत आहे. परंतु वर्ष भराच्या आत कोट्यावधी रुपये खर्च करून लोकसभा निवडणुकीच्या हव्यासापोटी घाईगडबडीत काम करून निकृष्ट पध्दतीने पुतळ्याचे बांधकाम केल्यामुळेच आजची ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेला पुर्णपणे जबाबदार हे मोदी सरकार व राज्याचे शिंदे सरकार आहे. जनतेच्या मनात राजकीय लाभ उठवण्यासाठी पंतप्रधान यांच्या हस्ते या राज्यसरकारने घाई गडबडीत उद्घाटन केले होते. परंतु भ्रष्टाचाराने माखलेल्या राज्य व केंद्र सरकार यांनी सातत्याने सत्तेच्या फायद्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून मते घेतली. पण नेहमीच या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा व महाराष्ट्राचा अपमान केला आहे. राज्य सरकारचा सार्वजनिक बांधकाम विभाग व अन्य विभागाने केलेल्या निकृष्ट कामामुळेच हा पुतळा कोसळला आहे. महाराजांच्या पुतळ्याच्या कामातही भ्रष्टाचार करणाऱ्या या सत्तापिपासू राज्यकर्त्यांना जनता कधीच माफ करणार नाही.
हा विषय आमच्या सर्व शिवप्रेमी जनतेच्या अस्मितेचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहेत. या दैवताचा अपमान देशातील व राज्यातील जनता कधीच सहन करणार नाहीत. हा पुतळा बांधकाम उभारणीसाठी कारणीभूत असलेल्या ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी, व कार्यकारी अभियंता तसेच अन्य विभागांचे अधिकारी आणि तसेच जबाबदार असणाऱ्या इतर अधिकारी यांचेवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. व ज्या सरकारच्या अधिपत्याखाली या पुतळ्याची उभारणी झाली होती त्यामधील मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सर्व प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामे द्यावेत. अन्यथा जिल्ह्यातील सर्व जनता रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल.