‘भावलेले जयवंत दळवी’

जयवंत दळवी जन्मशताब्दी वर्षानिमित्त को.म.सा.प. मालवणचा उपक्रम

पितृपक्षात १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पंधरा दिवस लेखांचे सोशल मीडियावर सादरीकरण

कोमसाप मालवणचा उपक्रम युवा वाचकांना मार्गदर्शक ठरणार-पद्मश्री मधु मंगेश कर्णिक

आचरा (प्रतिनिधी) : थोर सिद्धहस्त साहित्यिक आणि कोकण सुपुत्र जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा मालवण यांनी ‘भावलेले जयवंत दळवी’ हा साहित्यिक उपक्रम घेण्याचे ठरविले आहे.

कोमसाप मालवणची सदर कार्यक्रमा संबंधीची नियोजन बैठक नुकतीच पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. सदर योजनेबद्दल माहिती देताना सुरेश ठाकूर गुरुजी, (अध्यक्ष कोमसाप मालवण) म्हणाले, “थोर साहित्यिक, यशस्वी नाटककार, लोकप्रिय कथालेखक, मराठी मनाचा ठाव घेणारे कादंबरीकार, मर्मविनोदी लेखक जयवंत दळवी यांनी साहित्यात कविता सोडून उत्तुंग क्षेत्रे निर्माण केली. ते आपल्याच कोकणचे म्हणजेच आरवली (वेंगुर्ले)चे सुपुत्र, चालू वर्ष हे त्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. त्यांच्या अफाट साहित्यकृतीचा परिचय युवा वाचकांना व्हावा म्हणून हा उपक्रम घेण्यात आला आहे. यात दळवींच्या निवडक नाटके, कादंबरी, एकांकिका, लेख, विनोदी साहित्य यांचा युवा वाचकांना परिचय कोमसापचे ३० वाचक करून देणार आहेत. यात चंद्रशेखर मनोहर धानजी, उज्ज्वला चंद्रशेखर धानजी, पूर्वा मनोज खाडिलकर, वैजयंती विद्याधर करंदीकर, नारायण यशवंत धुरी , सुजाता सुनिल टिकले, सुगंधा केदार गुरव, अनघा विनोद कदम, श्रुती केशव गोगटे, विठ्ठल लक्ष्मण लाकम, वर्षाराणी बलवंत अभ्यंकर, देवयानी त्रिंबक आजगावकर, गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर, विजयकुमार लक्ष्मण शिंदे, सदानंद मनोहर कांबळी, मधुरा महेश माणगांवकर, दिव्या दीपक परब, श्रद्धा सतिश वाळके, रसिका राजेंद्र तेंडोलकर, चैताली गणपत चौकेकर, शिवराज विठ्ठल सावंत, ऋतुजा राजेंद्र केळकर, रामचंद्र नारायण वालावलकर, अमृता भवन मांजरेकर, योगेश मुणगेकर, वंदना राणे, माधवराव गावकर आणि सुरेश शामराव ठाकूर हे सहभागी झाले असून ते अनुक्रमे कारभाऱ्याच्या शोधात, विक्षिप्त कथा, सोहळा, कवडसे, आल्बम, नातीगोती, कहाणी , संध्याछाया, अतृप्त, मिशी उतरून देईन, वेचक जयवंत दळवी, कौसल्या, लोक आणि लौकिक, अधांतरी, परम मित्र, महानंदा, माजघर, सारे प्रवासी घडीचे, भंडाऱ्याचे हाॅटेल, स्वगत,चक्र, वेचक जयवंत दळवी, बाकी शिल्लक आदी निवडक पुस्तकांचा तरुण पिढीला परिचय करून देणार आहेत. जेणेकरून तरुण पिढीकडून दळवींच्या साहित्यकृती पुन्हा वाचल्या जातील.

पितृपक्षात दिनांक १८ सप्टेंबर २०२४ ते २ ऑक्टोबर २०२४ हे पंधरा दिवस सदर लेखांचे सादरीकरण प्रथम सोशल मीडियावर होईल. त्यानंतर ‘भावडलेले जयवंत दळवी’ चे दोन कार्यक्रम अनुक्रमे नगरवाचनालय (मालवण) व आरवली (वेंगुर्ले) येथे करण्याचा मानस आहे,” असे ठाकूर म्हणाले.

“कोमसाप मालवणचा हा उपक्रम प्रशंसनियच नाही तर युवा वाचकांना मार्गदर्शक ठरणार आहे,” असे गौरवोद्गार पद्मश्री मधु मंगेश कर्णिक (संस्थापक कोकण मराठी साहित्य परिषद संस्था) यांनी ह्या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!