वारगाव उपसरपंच नाना शेट्ये यांनी वारगावमधील सर्व दुचाकी चालकांना स्वखर्चाने केले हेल्मेट वाटप
वारगाव रिक्षा स्टँड मधील सर्व रिक्षांना पुढील टायर चेही करणार वाटप
तळेरे (प्रतिनिधी) : रस्ते अपघातात सर्वाधिक अपघात आणि मृतांची संख्या ही दुचाकी अपघातांची आहे. दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे नितांत गरजेचे आहे. आपल्या गावातील महिला पुरुष दुचाकी चालकांची काळजी घेत त्यांना स्वखर्चाने हेल्मेट वाटप करत वारगाव उपसरपंच नाना शेट्ये यांनी कै. बाळा वळंजू यांच्या समाजकार्याचा वसा जोपासला असल्याचे कौतुकोदगार जि प माजी सभापती बाळा जठार यांनी काढले. वारगाव उपसरपंच नाना शेट्ये यांच्या वतीने वारगाव गावातील सर्व दुचाकी चालकांना मोफत हेल्मेट वाटप वारगाव ग्रामपंचायत येथे करण्यात आले. यावेळी नाना शेट्ये यंच्यासह वारंगाव सरपंच नम्रता शेट्ये, खारेपाटण पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस नाईक उद्धव साबळे, माजी जि प सदस्या रत्नप्रभा वळंजू, ग्रामसेवक देवेंद्र नलावडे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष राजा जाधव, पोलीस कॉन्स्टेबल मोहिते , तलाठी आम्रसकर, ग्रा पं सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. देशाच्या 78 व्या स्वातंत्रदिनी 15 ऑगस्ट रोजी उपसरपंच नाना शेट्ये यांनी गावातील दुचाकी चालकांना हेल्मेट वाटप तसेच ज्या चालकांकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल त्यांना लायसन्स साठी सर्व आर्थिक भार उचलण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार 27 ऑगस्ट रोजी वारगाव ग्रामपंचायत मध्ये हेल्मेट वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना उपसरपंच नाना शेट्ये म्हणाले की उपसरपंच आणि गावचा नागरिक म्हणून गावातील जनतेचे सर्वार्थाने हित जोपासण्याचे कर्तव्य मी पार पाडत आहे.हेल्मेट शिवाय गाडी चालवताना अपघात घडून जर डोक्याला मार लागला तर तो आघात प्राणावर बेतू शकतो.हेल्मेट हे दुचाकी चालवताना आपले प्राणरक्षक कवच आहे. त्यामुळे पुरुष असो व महिला, प्रत्येक दुचाकी चालकाने दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे अत्यावश्यक आहे. रस्ते अपघातात हेल्मेट मुळे चालकाचे प्राण वाचतात . माझ्या वारगाव गावात विना हेल्मेट दुचाकीचालकांनी दुचाकी चालवू नये, आणि अपघात दुर्घटना घडल्यास जीवित हानी टळावी या उद्देशाने हेल्मेट वाटप केल्याचे उपसरपंच नाना शेट्ये यांनी सांगितले. पोलीस नाईक उद्धव साबळे यांनी विना हेल्मेट चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा त्यांच्यामध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. नाना शेट्ये यांनी हेल्मेट वाटपाचा सामाजिक उपक्रम राबवत चालकाने हेल्मेट वापरणे किती महत्वाचे आहे दाखवून दिल्याचे सांगितले. तंटामुक्ती समिती अध्यक्ष राजा जाधव यांनी निस्वार्थी वृत्तीने नाना शेट्ये यांनी राबविलेल्या उपक्रमाबद्दल कौतुक केले. ग्रामस्थांची अशा पद्धतीने काळजी घेणाऱ्या नाना शेट्ये याना निरोगी उदंड आयुष्य लाभो अशा सदिच्छा दिल्या. वारगाव गावातील ज्या दुचाकी चालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल त्यांनाही ड्रायव्हिंग लायसन्स शेट्ये यांच्या वतीने काढून देण्यात येणार आहेत. थ्रि व्हीलर ऑटो रिक्षा मध्ये पुढील टायर अत्यंत महत्वाचा असतो.जुनाट अथवा खराब टायरममुळे धावत्या रिक्षांचे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी वारगाव रिक्षा स्टँड मधील सर्व रिक्षांना पुढील टायर नाना शेट्ये हे स्वखर्चाने मोफत देणार आहेत.