कणकवली (प्रतिनिधी) : देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी घडणाऱ्या महिलांवरील, लहान मुलींवरील लैंगिक अत्याचार, हिंसेच्या घटनांमूळे सगळा देश हादरला असल्याचा अनुभव आपण सगळेच घेत आहोत. दिवसेंदिवस महिलांप्रती वाढणाऱ्या या घटनांचा विचार करता गुन्हे रोखण्यासाठी जसे सुरक्षितता या विषयावर काम करण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकांचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची नितांत आवश्यकता आम्हाला जाणवते. या कामाची नितांत आवश्यकता ओळखून समिती कार्यरत आहे. समाजात अलिकडे सातत्याने घडणा-या महिलांवरील बलात्कार आणि हिंसेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य महिला सहभाग विभागाच्या पुढाकारातून ‘स्त्री सन्मानासाठी पुरुषभान संवाद यात्रा’ सुरू करण्यात आली आहे. या यात्रेची सुरुवात कणकवली महाविद्यालय कणकवली येथून झाली. यावेळी बोलताना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य महिला सहभाग विभाग कार्यवाह आरती नाईक म्हणाल्या, “मुलींवरील वाढत्या अत्याचारांचे प्रमाण पाहता मुलींवर बंधने लादण्यापेक्षा मुलांबरोबर, पुरुषांबरोबर संवाद होणं ही अत्यावश्यक बाब आहे. कुटुंब, समाज कोणत्याही स्तरावर वयात येणाऱ्या मुलग्याना संवादापासून वंचित ठेवणे, हे समाजाला हानिकारक आहे”
ही यात्रा एकाच वेळी कणकवली नंदुरबार आणि गडचिरोली येथून सुरू झालेली आहे पुढे ही यात्रा महाराष्ट्रभर फिरणार आहे.
या यात्रेमध्ये 5 सप्टेंबर रोजी सर्व जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी आपापल्या ठिकाणी पदयात्रा काढली जाणार आहे. या दरम्यान वाटेत पत्रक देणं, प्रश्नावली भरून घेतली जाणार आहे. शालेय विद्यार्थी व शिक्षक वर्ग, कर्मचारी तसेच विविध अस्थापनामधील कर्मचारी यांच्यासह संवाद केला जाईल. तसेच प्रश्नावली भरून घेणे, स्त्री सन्मानाची सामूहिक प्रतिज्ञा वदवून घेणे, कार्यालयाना प्रतिज्ञेचे पोस्टर दर्शनी भागात लावण्यासाठी देणे, शाळा महाविद्यालयात कार्यक्रम घेणे, पोस्टर्स प्रदर्शनाद्वारे प्रबोधन करणे, जिल्हाधिकारी यांना निवेदन देणे असे कार्यक्रम राबविण्यात येतील. यावेळी संघटनेचे राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती जिल्हा कार्याध्यक्ष नामानंद मोडक कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महालिंगे, डॉ. सतीश पवार, प्रा. सोमनाथ कदम आदी उपस्थित होते