संदेश पारकर यांची मागणी ; राणेंच्या दबावातूनच आपटे याला काम मिळाल्याचा आरोप
कणकवली (प्रतिनिधी) : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा अवघ्या आठ महिन्यापूर्वी उभारलेला भव्य पुतळा कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली असून शिवप्रेमीमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे गायब झाला असून बांधकाम सल्लागाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण प्रकरणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वयंघोषित हिंदुत्ववादी नेते आणि कणकवलीचे आमदार नितेश राणे मौन पाळून बसले आहेत. जिल्हा वासियांसाठी हे धक्कादायक आहे. नितेश राणे आणि पुतळा शिल्पकार जयदीप आपटे यांचे जुने संबंध असून त्यातूनच आपटे याला राजकोटच्या पुतळ्याचे कंत्राट मिळाले असण्याची शक्यता आहे. राणे आणि आपटे यांच्या संबंधाची सखोल चौकशी करावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केली आहे.
काही वर्षांपूर्वी याच जयदीप आपटे याने बनविलेला अप्पासाहेब पटवर्धन यांचा पूर्णकृती पुतळा कणकवली नगरपंचायतीला नितेश राणे यांच्या कडून देण्यात आला. कोकणात पुतळा बसवण्याच्या कामात आपटे याचा तो चंचुप्रवेश होता. त्या वेळचे नितेश राणे आणि जयदीप आपटे यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या जुन्या संबंधातूनच राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे आव्हानात्मक काम आपटेला देण्यात आले असण्याची शक्यता पारकर यांनी व्यक्त केली आहे. आप्पासाहेब पटवर्धन यांचा तो पुतळा ही आपटे याची ट्रायल होती आणि नंतर क्षमता नसतानाही त्याला मोठी कामे देण्यात आली. तसेंच नितेश राणे आणी सार्वजनिक बांधकाम चे कार्यकारी अभियंता सर्वगोड यांचे ठेकेदार क्षेत्रातील किती चांगले घनिष्ठा संबंध हे जिल्ह्यातील सर्व ठेकदारांना माहित आहेत यामागे नितेश राणे आणि जयदीप आपटे यांचे हितसंबंध गुंतले आहेत असा आरोप पारकर यांनी केला.
शिवपुतळा कोसळल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड संतापाचे वातावरण आहे. राज्यभरातील नेते महाराष्ट्रभरातून राजकोट येथे येत आहेत. नितेश राणे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवतात. पक्ष बदलेल तशी त्यांची विचारधारा बदलत असते. मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांपेक्षा नितेश राणे अलीकडे कडवट हिंदुत्ववादी झाले आहेत. बांगलादेश, पश्चिम बंगाल, हैदराबाद, पाकिस्तान येथे घडलेल्या हिंदू वरील अत्याचारांबाबत ते फार आक्रमक असतात. पण त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात मालवण येथे तेवढी मोठी घटना घडली तरी त्यांनी या संदर्भात ब्रदेखील काढलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुत्वाचे आद्य पुरुष आहेत. त्यांचा सर्वात वाईट अपमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला. मात्र तरीही नितेश राणे अक्षरशः गप्प आहेत. त्यांचे हे मौन संशयाला जागा निर्माण करून देणारे आहे. जयदीप आपटे आणि आपल्या हितसंबंधांच्या संदर्भात नितेश राणे यांनी जाहीर खुलासा करावा. तसेच आपटे याला राजकोटच्या शिव पुतळ्याचे काम देण्यामागे राणे – आपटे हितसंबंध कारणीभूत आहेत का याची सखोल चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी करावी आणि आपटे याला काम देण्यात हे हितसंबंध जबाबदार असल्यास नितेश राणे यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील पारकर यांनी केली आहे