देवगड- निपाणी मार्गावरील खड्ड्यावर कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी – संतोष टक्के
अन्यथा सर्वपक्षीय उग्र आंदोलनाचा इशारा…
फोंडाघाट (प्रतिनिधी) : जुलैपासून संततदार पावसामुळे वीज- रस्ते आणि विविध योजनांची केलेलीं कामे यातील ठेकेदार आणि संबंधित विभागाच्या उन्हाळी कामांचे पितळ उघडे पडले आहे .निधीचा गैरवापर आणि निकृष्ट काम त्यामुळे जनतेसमोर आले असून नागरिकांमध्ये याबाबत तीव्र असंतोष आणि संताप व्यक्त होत आहे. गणेशोत्सव पाच-सहा दिवसांवर आल्याने फोंडा घाटातील ५/६ व्या वळणापासून ते हुंबरट तिठया पर्यंत मोठाले खड्डे पडले आहेत. साईड पट्ट्या खचल्या आहेत.उन्हाळ्यात रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्टीला लगतची माती ओढल्याने ती पावसाने वाहून गेली आहे.त्यामुळे रस्ता खचला असून वाहने रस्त्याखाली घेणे म्हणजे अपघातास निमंत्रण आहे.याबाबत चौकशी करण्यासाठी पीडब्ल्यूडी चे सक्षम अधिकारी जागेवर नाहीत तर दुय्यम अधिकारी उडवा- उडवी चे उत्तर देतात.सध्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी गावात पेवर ब्लॉक घालून तर बऱ्याच ठिकाणी चिरे फोडून खड्डे बुजविले आहेत.त्यामुळे सर्वत्र चिऱ्यांचा लाल चिखल निर्माण होऊन दुसऱ्या दिवशी पुन्हा खड्डे निर्माण होत आहेत.यामुळे चालक- व्यावसायिक- ग्रामस्थांना मनस्ताप भोगाव लागत आहे. गेल्या दोन दिवसात मुरूम- ग्रिट वापरून खड्डे भरणे, रोलिंग करणे युद्ध पातळीवर चालू आहे. मात्र पावसामुळे भरलेले खड्डे, वाहन गेल्यावर लगेच पुन्हा निर्माण होत आहेत. पेवर ब्लॉक उघडे पडले आहे. त्यामुळे बांधकाम कर्मचारी हतबल आहेत .उन्हाळ्यात निकृष्ट केलेल्या कामामुळे आज ही समस्या उद्भवली आहे. त्यामुळे हे निकृष्ट काम किमान उत्सव काळात सातत्याने एक दिवस एक दोन दिवस आड करून खड्डे मुक्त करावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि कणकवली तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोष टक्के यांनी संताप व्यक्त करून केली आहे.
गेल्या वर्षभरात फोंडाघाट वीज कार्यालयाकडून विविध कारणांसाठी वीज खंडित केली जाते. सध्या उत्सव काळात तर त्याचे प्रमाण फारच वाढले आहे.याबाबत मध्यंतरी आमदार नितेश राणे यांनी घेतलेल्या वीज मंडळाच्या हलगर्जी कारभाराबद्दलच्या बैठकीत फोंडाघाटच्या समस्यांवर अधिकाऱ्यांना विचारणा केली होती. मात्र अजूनही समस्या तशाच आहेत .वीज बिल वसुलीसाठी कर्तव्यदक्ष असलेले येथील अधिकारी यांचे उन्हाळ्यातील कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचे सिद्ध होत आहे. येथील वीज मंडळाच्या कारभाराबद्दल व्यावसायिक आणि फोंडावासी यामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. येथील कनिष्ठ अभियंत्यांची जरी बदली झाली असली, तरी गणेशोत्सव काळात वीज खंडित होणार नाही याची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घ्यावी. अन्यथा उत्सव काळात सर्वपक्षीय तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गावातील किमान बाजारपेठ -एसटी स्टँड – आ . केन्द्र ,गटारातील स्वच्छता, बाजारपेठेतील खंडित होणारी वाहतूक, रस्त्यावर जाणीवपूर्वक उभी राहणारी वाहने, दुचाकी- चारचाकी- रिक्षा- टेम्पो इत्यादी, अनधिकृत रस्त्यावर थाटलेली दुकाने, हॉकर्स यांचे अतिक्रमण इत्यादी निर्माण होणाऱ्या असुविधांकडे ग्रामपंचायतीने लक्ष देणे, उत्सव यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे.अर्थात ग्रामस्थांचे सर्वंकष सहकार्य आणि मदत यासाठी अत्यंत गरजेचे आहे.















