एस. टी. बस व जड अवजड वाहतूक फोंडाघाट मार्गे
वैभववाडी (प्रतिनिधी) : भुईबावडा घाटात सोमवारी सायंकाळी दरड पडल्यामुळे तब्बल २० तासा पेक्षा जास्त वेळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने युद्ध पातळीवर काम करीत मंगळवारी सायंकाळी दरड हटवून घाटातून हलकी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. मात्र एस. टी. बस व जड अवजड वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. ही वाहतूक फोंडा घाट मार्गे वळवण्यात आली आहे.
सह्याद्री पट्ट्यात झालेल्या ढग फुटी सदृश पावसाने भुईबावडा घाटाची दैना उडाली आहे. सात ठिकाणी दरडी कोसळल्या तर संपूर्ण घाटातील गटारे दगड मातीच्या गाळाने भरली आहेत. तर ठिकठिकाणी मोरया गाळाने भरल्या आहेत. त्यामुळे सोमवारी सायंकाळ पासून घाटातील वाहतूक पूर्ण पणे ठप्प झाली होती. अनेक वाहने घाटात अडकून पडली होती. सोमवारी रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरडी हटविण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र रात्रीच्या अंधारामुळे या कामात अडथळा येत होता. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून दरडी हटविण्याच्या काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले.
मंगळवारी सायंकाळी दरडी काढण्यात सार्वजनिक बांधकामला यश आले असले मोऱ्याची झालेली दुरावस्था व काही ठिकाणी तुटलेला रस्ता यामुळे घाटातून फक्त हलक्या वाहनांचीच वाहतूक सुरु करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून घाटातील एस टी बस वाहतूकसह सर्व प्रकारची जड अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. अशी माहीती सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता जोशी यांनी दिली आहे.












