खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील साळिस्ते गावच्या म.गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी साळीस्ते बौद्धवाडी येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते सुरेश सखाराम साळीस्तेकर यांची पुन्हा एकदा दुसऱ्यांना बिनविरोध फेरनिवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
साळीस्ते ग्रामपंचायतची ग्रामसभा नुकतीच गावचे सरपंच प्रभाकर ताम्हाणकर यांच्या अध्यक्षतेखाली दि.२७ सप्टेंबर २०२४ रोजी संपन्न झाली. या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सुरेश साळिस्तेकर यांची सर्वानुमते बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. यावेळी सरपंच प्रभाकर ताम्हणकर व उपसरपंच जितेंद्र गुरव यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष सत्कार केला. यावेळी माजी सरपंच चंद्रकांत हरयाण, अशोक कोकाटे, हिंमत कांबळे, पोलिस पाटील गोपाळ चव्हाण, मंगेश कांबळे व मान्यवर ग्रा.पं सदस्य उपस्थित होते.
सुरेश साळिस्तेकर हे गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून,सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भारिप उपाध्यक्ष तसेच साळिस्ते बौद्ध विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्य पार पाडले आहे.तसेच त्यांचे सर्व समाजात सलोख्याचे, सौजन्याचे संबंध असून तंटामुक्ती गाव समिती अध्यक्षपदी असतांनाही त्यांनी चांगल्या प्रकारे काम केले होते. त्यांच्या बिनविरोध फेरनिवडीबद्दल त्यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले आहे.