फोंडाघाट अखंड हरिनाम सप्ताहाच्या शेवटच्या रात्री जल्लोष- उत्साह- एकी आणि भक्ती तसेच नियोजनाचे अपूर्व दर्शन !

राधाकृष्ण मंदिर आणि हनुमान मंदिरातील उत्सवाची पहाटे सांगता

विविध उपक्रम, चित्ररथ, दिंड्या, चुरमुऱ्यांच्या उधळणीत आणि जयघोषात मंदिर- पेठेत भाविकांचा महापूर —

फोंडाघाट (प्रतिनिधी) : धुवांधार पाऊस आणि तरीही राधाकृष्ण मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताह, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपारिक आणि धार्मिक उपक्रमातून गेले सहा दिवस उदंड उत्साहात पार पडला. मात्र देवकीनंदन खेळीया च्या अंगीभूत चमत्काराने पावसाने चक्क दडी मारली. त्यामुळे बाल गोपाळ यांचे उत्साही नियोजन सफल होऊन अक्षरशः शेवटच्या सातव्या दिवशी भाविकांच्या उत्साहाला उधाण आले. 

सकाळी पूजाअर्चा झाल्यावर, फोंडाघाट जीवन विद्या मिशनचा उपासना यज्ञ, संदीप पारकर- राणे महाराज आणि सहकाऱ्यांचा हरिपाठ, सौ. विजया राणे,हरकुल यांचे भगवद्गीता वाचन, दुपारी कलावती आई भजन मंडळाचे भजन, संध्याकाळी गोखले गुरुजी यांचे सुश्राव्य प्रवचन, त्यानंतर वारकरी भजन असा नित्य उपक्रम पार पडला. सलग दहाव्या वर्षी आर के ग्रुपने घेतलेल्या निमंत्रित भजन स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांचे उपस्थितीत पार पडले. त्याशिवाय गेल्या सहा दिवसात केंद्र शाळा नंबर एक ने विविध गुणदर्शन, फोंडाघाट हायस्कूल व कॉलेज यांची रंगीत संगीत दिंडी तसेच पारंपारिक खेळ, पावणादेवी समई नृत्य ग्रुप, किंजवडे- देवगड यांचे समई नृत्य, रामेश्वर ढोल पथक, सुतारवाडी-करूळ यांचे ढोल वादन, महिलांसाठी हळदीकुंकू यासारखे प्रबोधनात्मक उपक्रम मोठ्या उत्साहात आणि उदंड उपस्थितीत पार पडले.बाजारपेठेला मनमोहक विद्युत रोषणाई, मंदिराला फुलांची सजावट, तसेच दिवसभर आल्हाददायक भक्ती- भावगीतांची सुरावट,ओटी  भरण्यासाठी भाविकांची महिलांची अहोरात्र गर्दी ओसंडत होती.

सातव्या दिवशी मारुती वाडी मधील मंदिरामध्ये सावंत- पटेल परिवार आयोजित एकदिवसीय अखंड हरिनाम जागर निमित्ताने आकर्षक रंगरंगोटी,t फुलांची सजावट आणि रोषणाई केलेल्या मंदिरामध्ये, फटाक्यांच्या आतशबाजीत, घटस्थापना करण्यात आली. नामस्मरणाच्या जल्लोषांनी भाविकांमध्ये उत्साह दिसत होता. रात्री सुशांत जोईल, काठवण- देवगड, सुजित परब, हरकुल बुद्रुक आणि व्यंकटेश नर,उंडील- देवगड, यांच्यामधील २०×२० चा तिरंगी भजन सामना रंगला. त्याला रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. याच दरम्यान राधाकृष्ण मंदिरामध्ये संतोष जोईल, खर्डा – आणि विनोद चव्हाण, भरणी- घोडगे यांचे मध्ये डबलबारी भजनाचा सामना उशिरा सुरू होऊन पहाटेपर्यंत रंगला. 

यादरम्यान बालगोपाळ मंडळाने श्रीदेवी माऊली दिंडी पथक, रेड्डी निर्मित “संत जनाबाई” यांच्यावर आधारित चित्ररथ रंगीत संगीत दिंडीमध्ये सादर केला. संत जनाबाई आणि सर्वेसर्वा वासुदेव यांच्या श्रद्धा भक्ती आणि चोरीचा आळ तसेच त्यावेळी केलेली मदत,या कथेवर आधारित हा देखावा सर्वांना सुखावून गेला.मंडळाचा विलोभनीय ड्रेस कोड, युवा- युवातीचे बेधुंद फुगड्या-झिम्मा, नाच,गोपाल कृष्णाचा जयजयकार, चुरमुऱ्यांची उधळण आणि शिस्तबद्ध रंगीत संगीत दिंडीचे फटाक्यांच्या आतशबाजित आणि ढोल ताशांच्या तालावर पुढे सरकणे,यामुळे बाजारपेठेत भाविक, ग्रामस्थ, अबाल वृद्धांमध्ये गर्दीचा एकच उच्चांक पहावयाला मिळाला. या दिंडीमध्ये रोमबाट-सोंगामुळे  प्रत्येकाला सेल्फी घेण्यास प्रवृत्त केले. उदंड उत्साह, जयघोष, जल्लोष,पावित्र्य राखत दिंडी ची पहाटे सांगता करण्यात आली. चालू वर्षी गुलाल विरहित दिंडी असल्यामुळे वाडी- वाडील वरील तसेच परगावातील ग्रामस्थ, अबाल वृद्ध यांनी सहभागी होऊन आनंद लुटला .

पहाटे मंदिरामध्ये गाऱ्हाणे ,नवस बोलणे- फेडणे इत्यादी धार्मिक बाबी झाल्यानंतर घट-पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. उगवाई नदी घाटावर घटांचे आरती- गाऱ्हाणे होऊन विसर्जन करण्यात आले. काकडा विझवण्यात आला. गेले सात दिवस नियोजनबद्ध उपक्रमाने संपन्न झालेला, विविध वैशिष्ट्यांनी नटलेला, राधाकृष्ण मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताह ची सांगता झाली. दुसऱ्या दिवशी श्रमपरिहारार्थ उसळपावासाठी मंदिरामध्ये बालगोपाळांनी एकच आनंद लुटला. चालू वर्षी रंगरंगोटी, विद्युत रोशनाई,झुंबर- फॅन्स-चौरंग- देव्हारा याकरिता बाल गोपाळ मंडळांनी खर्च करून उत्सवाला एक वेगळेच परिमाण प्राप्त करून दिले. सप्ताह शिस्तबद्ध ,नियोजनबद्ध, करण्यासाठी मंदिर व्यवस्थापन कमिटी आणि बालगोपाळ मंडळ, फोंडाघाटच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. याबद्दल फोंडावासीयांमध्ये सर्वत्र कौतुक होत आहे…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!