फुलपाखरांच्या गावात रंगीबेरंगी फुलपाखरु निरिक्षणाची पुन्हा सुवर्णसंधी….!!

4 ऑक्टोबर रोजी फुलपाखरू महोत्सवाचा शुभारंभ

सावंतवाडी (प्रतिनिधी) : आंबोली घाटातील पायथ्याशी दाणोली नजिक असलेल्या पारपोली ता.सावंतवाडी या गावात फुलपाखरांच्या वाढीसाठी अतिशय वैशिट्यपूर्ण सुक्ष्म वातावरण तसेच फुलपाखरांचे अन्न असलेली विविध प्रकारची फुले उपलब्ध असल्याने सुमारे 180 हुन अधिक विविध प्रकारची फुलपाखरे आढळुन आली आहेत. पारपोलीला सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या पाठींब्यामुळे महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव म्हणुन ओळख निर्माण झाली आहे. गतवर्षीच्या दोन दिवसीय फुलपाखरु महोत्सवाला पर्यटकांकडुन तसेच निसर्ग प्रेमींकडुन मिळालेला उत्तुंग प्रतिसाद पाहता यंदाचा ऑक्टोबर 2024 ते जानेवारी 2025 पर्यंतचा चार महिन्यांचा संपुर्ण फुलपाखरु हंगाम फुलपाखरु महोत्सव म्हणुन साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाची सुरुवात दिनांक 04 ऑक्टोबर 2024 रोजी उद्घाटनाने होणार आहे. चालु वर्ष फुलपाखरु महोत्सवाचे सलग दुसरे वर्ष असुन मागील वर्षातील पर्यटकांचा उत्स्फुर्त सहभाग पाहता यंदाच्या महोत्सव कालावधीत वाढ करण्यात आली आहे. यंदाच्या महोत्सवाचे सावंतवाडी वन विभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समिती

पारपोली यांचे संयुक्त विद्यमाने नियोजन केले आहे.

यावर्षीच्या फुलपाखरु हंगामात पर्यटकांना फुलपाखरु पदभ्रमंती, जंगल ट्रेक, सर्व सुखसोयीनीयुक्त होम स्टे तसेच मालवणी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. तसेच तज्ञ अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली फुलपाखरु जैवविविधता, स्थानिक भागात आढळणारे पक्षी, विविध दुर्मिळ वन्यजीवांची माहिती पर्यटकांना मिळणार आहे. शाळा- महाविद्यालयांना अभ्यास सहलीकरीता विशेष सवलत उपलब्ध करुन देण्यात आलो आहे. फुलपाखरु पदभ्रमंती करताना विद्यार्थ्यांना फुलपाखरे बघण्याची व त्यांच्याबद्दल अधिक माहिती समजुन घेण्याबरोबरच पर्यावरण व वन्यजीवांविषयी कुतूहल निर्माण होण्यास मदत होणार आहे. या महोत्सवाच्या आयोजनामुळे गावांतील स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. तसेच गावाच्या पर्यटन विकासासाठी चालना मिळणार आहे. निसर्गप्रेमींसह पर्यटकांनी या फुलपाखरु महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन वन विभाग सावंतवाडी, संयुक्त वन व्यवस्थापन समिती पारपोली आणि पारपोली ग्रामपंचायतीने केले आहे. फुलपाखरु महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी मेहबुब नाईकवडे 9545980746, सनिकेत पाटील 9766089048 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!