आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू वंदना पोतदार यांनी उपस्थित राहून केले मार्गदर्शन
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज खारेपाटण येथे आंतरराष्ट्रीय बुध्दिबळपटू व व्ही पी चेस अकॅडमी पुणे च्या संचालिका वंदना पोतदार यांच्या प्रमुख उपस्थित शुक्रवार दि.२७ सप्टेंबर व शनिवार दि.२८ सप्टेंबर २०२४ रोजी सलग दोन दिवसीय बुद्धिबळ खेळा विषयीची मोफत कार्यशाळा खारेपाटण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.
खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सानप यांच्या शुभहस्ते कार्यशाळेला उपस्थित असलेल्या प्रमुख मार्गदर्शक व आंतरराष्ट्रीय बुद्धीबळपटू वंदना पोतदार यांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्य शाळेमध्ये बुद्धिबळ खेळाविषयीची संपूर्ण माहिती व कौशल्य विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. इयत्ता पाचवी ते बारावीच्या सुमारे १००० विद्यार्थ्यांनी या मोफत कार्यशाळेचा लाभ घेतला. यावेळी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर, संचालक राजेंद्र वरुणकर, विजय देसाई, मुख्याध्यापक संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यशाळेनंतर नियमित बुद्धिबळ प्रशिक्षण वर्ग प्रशालेत माफक फी घेऊन सुरू होणार आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या बुद्धिबळ प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा व प्रशालेचे नाव उज्वल करावे असे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सानप यांनी केले आहे.