पुनाजी पारधिये यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
कणकवली ( प्रतिनिधी) : कळसुली गवसेवाडी येथील रहिवासी आणि ज्येष्ठ नागरिक पुनाजी सिताराम पारधिये उर्फ काका पारधिये (वय ७९) यांचे रविवारी २९ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुलगे, सुना, नातवंडे, पुतणे, पुतणी असा मोठा परिवार आहे.
पुनाजी पारधिये हे काका पारधिये या नावाने विशेष परिचित होते.मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांनी अनेक माणसे जोडली होती. ते नायटियेदेवी प्रासादिक भजन मंडळ कळसुली गवसेवाडीचे माजी अध्यक्ष,भजनीबुवा आणि मार्गदर्शक होते.त्यांना भजनाची विशेष आवड होती.सांस्कृतिक,धार्मिक, सामाजिक कार्यात त्यांचे मोठे योगदान होते.ज्येष्ठ समाजसेवक म्हणून त्यांची विशेष ओळख होती. त्यांच्या निधनामुळे एक नामवंत भजनीबुवा हरपल्याने कळसुलीसह कणकवली तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
कळसुली गवसेवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर सोमवारी ३० सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठया संख्येने उपस्थित होती.कळसुली सरपंच सचिन पारधिये यांचे ते वडील होत.