आचरेकर प्रतिष्ठान मध्ये उद्या 2ऑक्टोबर रोजी हत्ती येतोय

हत्ती घूस रेडा गेंडा या नवीन नाटकाचा होणार शुभारंभी प्रयोग

कणकवली (प्रतिनिधी) : वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली ही संस्था गेली 47 वर्ष सांस्कृतिक क्षेत्रात भरीव असे काम करीत आहे. संस्थेने शास्त्रीय संगीत, नाथ पै एकांकिका स्पर्धा ,नाट्य महोत्सव अशा सातत्यपूर्ण उपक्रमांबरोबरच नाट्य निर्मिती मध्ये देखील योगदान दिले आहे आजपर्यंत संस्थेने 16 नाटकांची तर 22 एकांकिकांची निर्मिती करून त्याचे विविध राज्यांमध्ये प्रयोग केले आहेत. तसेच राज्य नाट्य स्पर्धा एकांकिका स्पर्धा या राज्यस्तरीय स्पर्धेत पारितोषिके देखील प्राप्त केली आहेत. यावर्षी संस्थेने ललित कला केंद्र मधून नाट्यशास्त्र विषयाचे शिक्षण घेतलेले व फ्लेमिंगो गोवा या संस्थेच्या तरुण दिग्दर्शक केतन जाधव यांच्या दिग्दर्शनाखाली नवीन नाटकाची निर्मिती केली आहे या हत्ती,घूस,रेडा,गेंडा नाटकाचे लेखन योगेश्वर बेंद्रे यांनी केले असून या व्यंगनाट्यामध्ये राजाच्या हत्तीमुळे त्रस्त झालेल्या एका गावाची गोष्ट आहे. या हत्तीच्या विध्वंसक वर्तनाने हैराण झालेले गावकरी केवळ हा हत्ती राजाचा लाडका असल्याने त्याचाबद्दलची तक्रार मांडू शकत नाहीत. समूह मानसिकता आणि सामाजिक दडपण यांतून मार्ग काढताना हत्तीवर टीका करण्याऐवजी गावकरी विनोद करत हत्तीची स्तुती करत राहतात. अंतिमतः गावकरी एका नवीन देशाची निर्मिती करण्याचा प्रयत्न करतात. सभोवतालची परिस्थिती लोकशाही धोक्यात आणणारी असतानाही हे गावकरी खऱ्या लोकशाहीची स्थापना करण्याचे प्रयत्न करत राहतात. ९० मिनिटांचे हे मराठी नाटक सिरियन नाटककार सादल्ला वानौस यांच्या ‘The Elephant, Oh the King of Time’ या नाटकापासून प्रेरित आहे. स्थानिक परंपरा,वर्तमान आणि भविष्य यांची सांगड घालत हे नाट्यबीज विकसित करण्यात आले आहे.

या नाटकाचा प्रयोग आज रात्री 9.30 वाजता वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली येथे प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात सादर होणार आहे. या नाट्यप्रयोगाला ज्येष्ठ रंगकर्मी राजीव नाईक,प्राध्यापक प्रवीण बांदेकर व नाट्य समीक्षक किरण येले उपस्थित राहणार आहे तसेच जिल्ह्यातील मान्यवर देखील या प्रयोगाला उपस्थित राहणार असून या नाटकाचे प्रवेश मूल्य रुपये 300 व रुपये 200 असून प्रवेशिका प्रयोगाच्या वेळी उपलब्ध होणार आहेत तरी नाट्य कलावंतांनी व नाट्य रसिकांनी या प्रयोगाला उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष एड.एन आर. देसाई यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!