आचरा येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्सहात साजरा…!

जेष्ठ नागरिक सेवा संघ आचराचे संस्थापक सदस्य लक्ष्मणराव आचरेकर यांना ज्येष्ठ सेवा पुरस्कार प्रदान

आचरा (प्रतिनिधी) : ज्येष्ठनी छंद, मनोरंजन, सेवा आणि कार्यमग्नता अवलंबावी. ठराविक कालावधीनंतर ज्या समाजाने आपणास लहानाचे मोठे केले त्या समाजाचे ऋण फेडावे. मात्र आयुष्यभर नारद मुनींची कल्पकता, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची अभ्यासू वृत्ती आणि संत तुकोबांची ईश्वरसेवा यांचे अनुकरण करावे त्यामुळे आपले जीवन सुखी आणि आनंदी होईल’ असे उद्गार प्रदीप गोपाळराव परब मिराशी (अध्यक्ष श्री देव रामेश्वर संस्थान्यास आचरे) यांनी ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे पंचक्रोशी (फेस्कॉन संलग्न) महामेळाव्यात मार्गदर्शन करताना काढले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष अशोक धोंडू कांबळी हे होते. जागतिक जेष्ठ नागरिक दिन आचरा येथिल रामेश्वर मंदिराच्या सभागृहात संपन्न झाला. प्रारंभी बाबाजी गोपाळ भिसळे (जेष्ठ नागरिक संघ सल्लागार) यांनी प्रास्ताविक करून ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे कार्य आणि उपक्रम विशद केले. यावेळी जेष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने प्रारंभी प्रदीप गोपाळ परब मिराशी यांचा अशोक धोंडू कांबळी यांच्या हस्ते शाल श्रीफळ प्रदान करून सत्कार करण्यात आला.

त्यानंतर श्रुती केशव गोगटे, स्मिता सुरेश हडकर, नामदेव आडवलकर, सुहास सिताराम हडकर या ज्येष्ठांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले. तर श्री.सौ.सुरेश हडकर आणि श्री. सौ.अनिल पारकर या दाम्पत्यांना विवाहाला ४५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. वयाच्या 70 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रमाकांत शेट्ये, शिवराम शेटये, दीपक आचरेकर, चंद्रकांत साळकर, राजश्री गोसावी यांचाही ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.जेष्ठ नागरिक सेवा संघ आचरेचे संस्थापक सदस्य लक्ष्मणराव भिवा आचरेकर यांना ज्येष्ठ सेवा संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी आणि प्रमुख मार्गदर्शक प्रदीप गोपाळराव परब मिराशी यांच्या हस्ते जेष्ठ सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानचिन्ह, मानपत्र असे देऊन जेष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने त्यांचा त्यांना जेष्ठ सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना लक्ष्मण आचरेकर म्हणाले हया सत्काराने मी भारावून गेलो ‘रामेश्वराची कृपा ज्यावरी, शातधारांनी झरे, कला सक्त हे गुणीजन मंडित पुण्यग्राम आचरे’ अशा पुण्यक्रमात माझा सत्कार होणे हे माझ्या जीवनाचे सारखे सार्थक आहे. रामेश्वर मंदिर हा माझा प्राण आहे आणि तेथेच त्यांच्या अध्यक्षांचे हस्ते माझा सत्कार होणे हे मी माझे भाग्य समजतो. सर्वांनी माझ्यावरती जे प्रेम केले ते प्रेम मी कदापि विसरू शकत नाही. जेष्ठ नागरिक सेवा संघाचा मी ऋणी आहे.

अध्यक्ष स्थानावर बोलताना अशोक कांबळी म्हणाले ‘आमचा ज्येष्ठ नागरिक सेवा संघ सहलीपासून लाडकी कन्यापर्यंत आणि विद्यार्थ्यांचे गुणगौरव सोहळ्या पासून जेष्ठ यांचे वाढदिवस साजरी करण्यापर्यंत अनेक उपक्रम राबवतो. त्यामुळे जेष्ठांचे जीवन आनंदायी होते. आमचा संघ हा जागतिक ज्येष्ठ नागरिक सेवा संघ (फेस्कॉनशी) संलग्न आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जकारीन फर्नांडिस यांनी केले, तर आभार मनाली फाटक (ज्येष्ठ महिला कार्यकारणी अध्यक्ष) यांनी मानले. यावेळी संतोष मिराशी उपसरपंच आचरा, कपिल गुरव (ट्रस्टी रामेश्वर देवस्थान), सुरेश ठाकूर, बाजेल फर्नांडिस, भिकाजी कदम आदी मान्यवर आणि ज्येष्ठ नागरिक सेवा संघ पदाधिकारी याचबरोबर बहुसंख्य जेष्ठ नागरिक उपस्थित होते. पसायदाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!