सिंधुदुर्गातील घराणेशाही संपविणारा ठाकरे शिवसेनेचा तो उमेदवार कोण ?

जिल्ह्यात त्या बॅनर ची एकच चर्चा

कणकवली (प्रतिनिधी) : तो येतोय…सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घराणेशाही नष्ट करण्यासाठी.. कणकवली विधानसभा ..अशा आशयाचा आणि खाली मशाल चिन्हासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उल्लेख असलेला बॅनर कणकवली शहरात रातोरात झळकला. हा बॅनर देवगड वैभववाडी तालुक्यातही झळकल्याची चर्चा आहे.मात्र या बॅनर ची जोरदार चर्चा सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू झाली आहे. ही नेमकी घराणेशाही कोणाची ? कुठल्या घराण्यात अनेक उमेदवार आहेत ? या प्रश्नापासून ही चर्चा सुरू झाली असली तरी तो येतोय असा उल्लेख असलेला ठाकरे शिवसेनेचा कणकवली विधानसभेचा नेमका उमेदवार कोण याचीही चर्चा आता जोर धरू लागली आहे.विधानसभा निवडणुक अगदी तोंडावर आली असून 12 ऑक्टोबर ला असलेल्या दसऱ्यानंतर लागलीच निवडणूक आचारसंहिता लागेल.असे असले तरी अद्याप कणकवली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठाचा उमेदवार कोण हे ठरलेले नाही. कालच म्हणजे 2 ऑक्टोबर रोजी खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत गुफ्तगू केले. राणे-शिंदे भेटीतून माजी खासदार निलेश राणे हे भाजपातून शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करतील आणि कुडाळ मालवण मतदारसंघातून विधानसभा लढवतील असा अर्थ काढला जात आहे. राणेंच्या कुटुंबातून स्वतः नारायण राणे हे भाजपाचे लोकसभेचे खासदार आहेत, त्यांचे कनिष्ठ सुपुत्र आमदार नितेश राणे हे कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचे भाजपाचे विद्यमान आमदार असल्याने नितेश राणे हेच पुन्हा विधानसभा लढविणार हे नक्कीच आहे. त्यामुळेच एकाच घरात तीन उमेदवार देण्याबाबत भाजपामध्ये कदाचित चलबिचल असेल आणि म्हणूनच निलेश राणेंना कुडाळ मालवण मध्ये शिंदेंच्या शिवसेनेतून उमेदवारी देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. घराणेशाही च्या अर्थाने पाहिले तर अज्ञाताने जो बॅनर लावला आहे तो अंगुलीनिर्देश राणे कुटुंबाकडे जातो त्याचप्रमाणे तो नाईक कुटुंबाकडेही जातो.कारण नाईक कुंटुंबातील वैभव विजय नाईक हे शिवसेना उबाठा चे कुडाळ मालवण मतदारसंघाचे विद्यमान आमदार असल्यामुळे ते पुन्हा विधानसभा लढविणार हे ठरलेलेच आहे.कणकवली विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर ठाकरे शिवसेनेकडून जसे संदेश पारकर, अतुल रावराणे, सतीश सावंत हे विधानसभेला इच्छुक उमेदवार आहेत तसेच युवासेना जिल्हाप्रमुख असलेले सुशांत श्रीधर नाईक हेही उमेदवारी चे प्रबळ दावेदार बनले आहेत. आमदार वैभव नाईक यांचे सख्खे चुलत भाऊ असलेले सुशांत श्रीधर नाईक यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली तरी तीही एक प्रकारे नाईक कुटुंबाची घरणेशाहीच होऊ शकते. त्यामुळे आता हा लावण्यात आलेला हा बॅनर ठाकरे शिवसेना पक्षांतर्गत कुरघोडीचा भाग असल्याचीही वेगळी चर्चा रंगते आहे. तूर्तास हे बॅनर काढून टाकण्यात आले असले तरी एवढे मात्र नक्की आहे की तो येतोय असा सूचक निर्देश असलेला कणकवली विधानसभेचा नेमका उमेदवार कोण ? हीच चर्चा सध्या जास्त रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!