बेंचेस घोटाळ्या मधील काही ठेकेदार आमदार राणेंच्या आरक्षण बचाव रॅलीत सहभागी

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप

महा युतीतील इतर पक्षांना आमदार राणे किंमतच देत नाहीत

कणकवली (प्रतिनिधी) : आरक्षणाच्या मुद्द्यावर मागासवर्गीय समाजाची दिशाभूल करणारे आमदार नितेश राणे हे याच मागासवर्गीय समाजाचा हक्काचा निधी असलेला समाज कल्याण विभागांमध्ये केलेल्या बॅंचेस घोटाळ्याच्या विषयावर गप्प का?आरक्षण बचाव रॅलीमध्ये नितेश राणेंनी बॅंचेस घोटाळ्या प्रकरणावर भाष्य का केले नाही ? एकिकडे आरक्षित समाजाच्या बाजूने गळे काढायचे आणि दुसरीकडे मात्र त्याच मागासवर्गीय समाजाला मिळणाऱ्या सुविधांमध्ये योजनेमध्ये भ्रष्टाचार करायचा व प्रकरण अंगाशी आल्यावर मूग गिळून गप्प बसायचं ही आमदार नितेश राणे ही भूमिका असल्याचा घनाघात युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला. आरक्षण बचाव रॅलीमध्ये देश स्तरावर बोलणाऱ्या नितेश राणे यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघात समाज कल्याण विभागामध्ये करण्यात आलेला बेंचेस घोटाळा या बाबत बोलणे टाळले. त्यांच्याच पक्षातील बॅंचेस घोटाळ्या प्रकरणातील काही ठेकेदार आरक्षण बचाव रॅलीत सहभागी झालेले दिसले. त्यामुळे बेंचेस घोटाळ्याच्या भ्रष्टाचाराच्या पैश्यातून ही रॅली काढण्यात आली आहे काय ? ते सुद्धा आमदार नितेश राणेंनी जाहीर करणे गरजेचे होते. नितेश राणेंनी काढलेली आरक्षण रॅली ही महायुती म्हणून घोषित करण्यात आली होती. पण आज प्रत्यक्षात महायुतीतील कोणताही घटक पक्ष या रॅलीत सहभागी झालेला दिसला नाही. खरं तर नितेश राणे हे महायुतीतील घटक पक्षांना किंमतच देत नाही. यामुळे सद्यस्थितीत महायुतीतील घटक पक्ष नितेश राणें सोबत नाही असे दिसून येते. नितेश राणे सतत मुस्लिम बांधवांवर करत असलेली व्यक्तव्य ही महायुतीतील घटक पक्षांना मान्य आहेत काय ? त्याबरोबरच आरक्षण बचाव रॅलीत व व्यासपीठाच्या आजूबाजूला बॅंचेस घोटाळा प्रकरणातील ठेकेदार दिसत होते. ज्यांना या घोटाळ्यातून पैसे मिळाले त्यांनाच या रॅलीसाठी माणसे आणण्याची जबाबदारी दिल्याची ही मागासवर्गीय समाजामध्ये चर्चा आहे. व याच ठेकेदारंकडून भ्रष्टाचाराच्या पैशातून ही रॅली काढण्यात आली अशी चर्चा जनतेमध्ये आहे. ही रॅली जाणवली पुलापासून जी काढण्यात आली त्यात वस्तुस्थिती बघता कणकवली मतदार संघातील जनता सहभागी झाली नाही. ठेकेदार व राणेंच्या जवळचे कार्यकर्ते असलेल्यांची ही रॅली झाली या उलट बॅंचेस घोटाळा प्रकरणाच्या विरोधात मागासवर्गीय समाज बांधवांनी आपल्या हक्कासाठी काढलेल्या रॅलीत सुमारे 1000 पेक्षा जास्त मागासवर्गीय समाज बांधव व महिला सहभागी झाल्याचे दिसून आले. बेंचेस घोटाळ्याचा मागासवर्गीय समाज बांधवानी एकत्रित येऊन आपल्या हक्काच्या निधी साठी आवाज उठविला ते नितेश राणें साठी चपराक होती.याचा अर्थ नितेश राणेंच्या पाठीशी मागासवर्गीय समाज नाही आहे हे स्पष्ट दिसून आले. त्यामुळे त्यांना मतदारसंघ बाहेरील माणसे आयात करावी लागली. आमदार नितेश राणे यांनी अश्या दुटप्पी भुमिका घेऊन जनतेची करत असलेली दिशाभूल आता थांबवावी. नितेश राणे करत असलेली दिशाभूल ही कणकवलीच्या जनतेला चांगलीच समजून आली आहे व याचे प्रतिउत्तर म्हणून येणाऱ्या विधानसभेला नितेश राणे यांचा पराभव हा निश्चित आहे. व नितेश राणे हे निव्वळ ठेकेदारी पोसण्यासाठीच काम करतात हे सुद्धा या समाजाला दिसून आले आहे. कार्यकर्त्यांना धमक्या देऊन आता तुम्ही कुणाचा आवाज दाबू शकत नाही हे सुद्धा आमदार राणे यांनी लक्षात ठेवावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!