महाविकास आघाडी चे “ढोल बजाओ,आरोग्य यंत्रणा सुधारो आंदोलन
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालया मध्ये ७० टक्के हुन अधिक पदे रिक्त असल्याने जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. तर येथे शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य हा चिंतेचा विषय बनला आहे याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच अधिष्ठता यांच्या कार्यपद्धतीचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश द्वारावर “ढोल बजाओ,आरोग्य यंत्रणा सुधारो आंदोलन करण्यात आले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन तीन वर्षे झाली तरी अद्याप या ठिकाणी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा, मशनरी, तसेच वैद्यकीय अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी, यांची पदे भरण्यात आलेली नाहीत. मोठ्या प्रमाणात मंजूर पदे असताना या ठिकाणी मंजूर पदापैकी ७० टक्के पदे अद्यापही रिक्त आहेत. याकडे शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केला आहे. यामुळे महाविद्यालयाची तसेच जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेची वाताहत लागली आहे.रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ मिळणे कठीण बनले आहे. “आला पेशंट की पाठवा गोव्याला” अशी काहीशी दुरावस्था सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजची झालेली आहे.कोणताही पेशंट आला की गोव्याला पाठविण्याच्या पलीकडे कोणतेही काम शासकीय मेडिकल कॉलेज करत नाही.सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भोंगळ कारभार सुरु आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर होऊन तीन वर्षे झाली तरी अद्याप त्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या आणि भविष्यात डॉक्टर म्हणून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आवश्यक असलेले प्राचार्य, प्राध्यापक,यांची भरती केलेली नाही,नवीन इमारतीच्या कामाला अद्याप सुरुवात केलेली नाही,विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या वर्गखोल्या नाहीत,वसतीगृहाची व्यवस्था केलेली नाही,अपुरे कर्मचारी वर्ग,अपुरा औषधपुरवठा, सिटीस्कॅन मशीन बंद, कोणत्याही शस्त्रक्रिया होत नाहीत. त्यामुळे हे वैद्यकीय महाविद्यालय केवळ नावापुरते सुरु आहे . येथे विद्यार्थ्याना दर्जेदार शिक्षणही मिळत नाही आणि रुग्णांना उपचार मिळत नाहीत . येथे कार्यरत असलेले डॉक्टर अथवा प्राध्यापक यांच्याकडून कोणतीही खरी माहिती दिली जात नाही. असा आरोप करत याविरोधात आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने आज जोरजोरात ढोल वाजवत तसेच शासन आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता विरोधात घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले. येथे करण्यात आलेल्या “ढोल बजाओ आरोग्य यंत्रणा सुधारो”आंदोलनात शिवसेना(ऊबाठा) जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, संजय पड़ते,अभय शिरसाट,साईनाथ चव्हाण, नागेश मोरये,अवधूत मालणकर, यांच्यासह महा विकास आघाडीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. आंदोलनानंतर वैभव नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांना आपले निवेदन सादर केले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मनोज जोशी उपस्थित न राहिल्याने सर्वच पदाधिकारी यांनी तीव्र संताप व्यक्त केला. तर अधिष्ठता ज्यावेळी हजर होतील, त्यावेळी पुन्हा भेट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष त्यांना जाब विचारला जाईल. असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी यावेळी दिला.