जिल्ह्यातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांचे रिलायन्स कंपनी व स्कायमेट विरोधात धरणे आंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सन २०२३-२४ मधील पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा नुकसान भरपाई अल्प स्वरुपात मिळत असल्याने आज जिल्ह्यातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांनी रिलायन्स कंपनी व स्कायमेट विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयसमोर धरणे आंदोलन केले.

रिलायन्स कंपनीने फळपिक विमा नुकसान भरपाई मध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. २५ एप्रिल ते १५ मे पर्यंत तीव्र उष्णतेमुळे पारा ३८ अंश सेल्सियसपर्यंत पोहचला परंतु यामध्ये असे दिसून येते कि वेंगुर्ला, मालवण, देवगड या ठिकाणी आंबा उत्पादक शेतकरी यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांना अल्प स्वरुपात नुकसानभरपाई मिळते, ही बाब शेतकऱ्यांच्या विषयी दुर्दैवी बाब आहे. त्याचप्रमाणे जेथे काजू उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत अश्या शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये व काजू करिता हेक्टरी ५०,००० रुपये पिक विमा नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. जर वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे सारख्या मंडळाला तापमानाची नोंद होते. मग लगतच्या मंडळाला त्याची नोंद का दाखवत नाही? असा प्रश्नही यावेळी या आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

त्यातही महत्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांची आरक्षित रक्कम मिळणे क्रमप्राप्त असून तीही शेतकऱ्यांना मिळत नाही. तरी कोणतेही निकष न पहाता तात्काळ विमा कंपनीशी चर्चा करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर विमा नुकसान भरपाई देण्यात यावी. या मागणीसाठी तसेच रिलायन्स कंपनी व स्कायमेट विरोधात जिल्ह्यातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष शामसुंदर राय, प्रफुल्ल परब, अर्जुन नाईक, आग्नेल फर्नांडिस, संदीप देसाई, प्रकाश वारंग, अनंत परब आदीसह मोठ्या संखेने शेतकरी सहभागी झाले होते.

तर निवडणुकीवर बहिष्कार टाकू शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याकडे शासनाचे आणि लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होत आहे. मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न येत्या आठ दिवसांत मार्गी न लागल्यास निवडणुकीवर बहिष्कार घालू असा इशाराही यावेळी या शेतकऱ्यांनी दिला आहे.

error: Content is protected !!