अवघ्या 3 महिन्यांच्या सरावाने 50 मीटर आर्चरी स्पर्धेत मिळवले सुयश
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुकन्या आर्चरीपटू अक्सा मुद्स्सरनझर शिरगावकर हिने सीबीएसई नॅशनल आर्चरी चॅम्पियनशिप मध्ये 14 वर्षे वयोगटात सहावा क्रमांक मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान उंचावली आहे. कणकवली पोदार स्कुल ची विद्यार्थिनी असलेल्या अक्सा शिरगावकर हिने नवी दिल्ली येथे पार पडलेल्या सीबीएसई नॅशनल आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेत हे उज्वल यश संपादन केले आहे. रोहिणी नवी दिल्ली येथील महाराजा अग्रसेन मॉडेल स्कुल मध्ये 21 ते 24 ऑक्टोबर दरम्यान सीबीएसई नॅशनल आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. आपल्या पहिल्याच नॅशनल आर्चरी स्पर्धेत स्पर्धेत अक्सा हिने देशभरातील 32 स्पर्धकांमधून सहावा क्रमांक मिळवला. 50 मीटर आर्चरी स्पर्धेत केवळ 3 महिन्यांच्या सरावानंतर अक्सा हिने हे सुयश मिळवले आहे. याआधी अक्सा हिने 30 मीटर आर्चरी स्पर्धेत राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळवले आहे. कलमठ येथील शासकीय ठेकेदार मुद्स्सरनझर शिरगावकर आणि न्यू खुशबू स्वयंसहाय्यता बचत गटाच्या संस्थापिका तन्वीर शिरगावकर यांची अक्सा ही सुकन्या आहे. सातारा येथील दृष्टी आर्चरी अकॅडमी चे संस्थापक प्रशिक्षक प्रवीण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अक्सा हिने हे यश मिळवले आहे. नॅशनल आर्चरी स्पर्धेत सहावा क्रमांक मिळविल्याबद्दल अक्सा हिचे कौतुक होत आहे.











