वैभववाडीतील पथ विक्रेत्यांची उच्च न्यायालयात धाव

वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे वैभववाडी नगरपंचायतीने फोंडा उंबर्डे रोडवरील पथविक्रेत्यांविरोधात अतिक्रमण हटविण्याची कारवाई केल्यानंतर 8 पथविक्रेत्यांनी सदर कारवाईला रीट याचिकेद्वारे उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सदर याचिकेद्वारे असा दावा करण्यात आला आहे की हे सर्व पथविक्रेते साधारपणे 1990 पासून या ठिकाणी पथविक्रीच्या माध्यमातून आपली उपजीविका चालवत आहे. 2015 साली वाभवे वैभववाडी ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली तरीही त्यांचा व्यवसाय आजपर्यंत सुरु होता. सदर याचिकेत असाही दावा करण्यात आला आहे की याचिकर्ते हे ग्रामपंचायत तसेच नंतर अस्तित्वात आलेल्या नगरपंचायत ला देखील त्यांच्या स्टॉल्सच्या बद्दल कर भरत होते. त्यामुळेच दिनांक 11/01/2002 रोजी ग्रामपंचायत वैभववाडी यांनी सदर पथविक्रेता यांना त्याच ठिकाणी पथविक्री करु देण्याबद्दल ठराव पास केला होता. सदर ठरावाची अंमलबजावणी व्हावी म्हणून ग्रामपंचायतीने तत्कालीन पालकमंत्री अजित घोरपडे यांना 19 जानेवारी, 2002 रोजी पत्र लिहून कळविले होते. तेंव्हापासून हे पथविक्रेते पथविक्री करून त्यांची उपजीविका चालवत होते. मात्र अचानक 19/01/2023 रोजी नगरपंचायतीने सर्व पथविक्रेत्यांना जागा खाली करण्यासाठी नोटिसा देऊन दिनांक 23/02/2023 रोजी पथविक्रेत्यांनी उभ्या केलेल्या तात्पुरत्या स्टॉल्सवरती बुलडोझर चालवून त्यांची उपजीविका हिसकावून घेतली असल्याचा आरोप याचिकेतून केला आहे.

वकील एकनाथ ढोकळे यांचेमार्फत दाखल केलेल्या याचिकेत वैभववाडी नगरपंचायतीने केलेली कारवाई बेकायदेशीर ठरविण्यात यावी, तसेच सदर रस्ता नैसर्गिक बाजारपेठ म्हणून घोषित करण्यात यावा अशा मागण्यांसोबतच पथविक्रेत्यांना त्यांच्या मूळ जागी पुन्हा पथविक्री करण्याची परवानगी द्यावी तसेच बेकायदेशीर कारवाई करणाऱ्या नगरपालिका अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी अशा मागण्या याचिकेद्वारे करण्यात आल्या आहेत. सदर याचिकेसाठी Adv.ढोकळे याना Adv.सुदिप कांबळे मदत करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!