जळीत नौकेवर सापडले तांडेलाच्या मृतदेहाच्या हाडांचे अवशेष

अवशेषाची होणार कोल्हापूर येथील फॉरेन्सिक टीमकडून तपासणी

देवगड (प्रतिनिधी) : देवगड कुणकेश्वर समुद्रात सुमारे १५ वावात मच्छिमारी करताना नौकेवरील खलाशी यांनी तांडेल याच्याशी झालेला किरकोळ वाद मनात ठेवून मच्छिमारी करतानाच तांडेलाच्या मानेवर सुरीने सपासप वार करून त्याचे शीर धडावेगळे करून तांडेलाचा निर्घुण खुन केल्यानंतर नौका पेटवून दिली.ही कौर्याची परिसीमा गाठणारी घटना दि. २८ ऑक्टोबर रोजी देवगड समुद्रात दुपारी १ वा.सुमारास घडली.याप्रकरणी देवगड पोलिसांनी अटक केलेल्या संशयित जयप्रकाश धनवीर विश्वकर्मा २७ रा.तपकरा बाधरकोना जशपुरनगर छत्तीसगड याला मंगळवारी देवगड न्यायालयासमोर हजर केल्यानंतर ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.दरम्यान सोमवारी पेटविलेल्या नौकेवरील आग विझविण्याचा इतर नौकांनी आटोकाट प्रयत्न केल्यानंतर त्याला यश आले व जळीत नौका देवगड बंदरात आणण्यात आली तर उर्वरीत २४ खलाशांनाही देवगड बंदरात आणण्यात आले व त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.दरम्यान मंगळवारी जळीत नौका देवगउ जेटीनजिक सुरक्षित स्थळी लावण्यात येवून नौकेत साचलेले पाणी पंपांच्या सहाय्याने स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने काढण्याचे काम दिवसभर सुरू होते.पाणी काढून झाल्यानंतर दाखल झालेल्या फॉरेन्सिक टीमने मयत तांडेलाचे मृतदेहाचे हाडांचे अवशेष सापडले.या अवशेषाची तपासणी फॉरेन्सिक टीमकडून करण्यात येणार आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार नुमान रफिक फणसोपकर व अरफात हमीद फणसोपकर रा राजीवाडा रत्नागिरी यांच्या मालकीची नुजत राबीया नौका ही दि. २८ रोजी दुपारी १२ वा.सुमारास देवगड कुणकेश्वर समुद्रात मच्छिमारी करीत होती. या नौकेवरील सर्वांचे जेवण झाल्यानंतर दुपारी १ वाजता मासेमारीकरीता जाळे पाण्यात टाकले.त्यावेळी नौकेवरील दिलदार शेख ३९ रा.बरगी, कुमटा कारवार कर्नाटक यांना खलाशांचा ओरडण्याचा आवाज आला त्यामुळे नौकेच्या केबीनमध्ये असलेले शेख हे बाहेर आले.खलाशांपैकी प्रमोद रजाक यांनी जेवणी जयप्रकाश धनवीर विश्वकर्मा हा तांडेल रविंद्रको सुरीसे मार रहा है असे ओरडला.त्यावेळी शेख यांनी जेवणी विश्वकर्मा यांने तांडेल रविंद्र नाटेकर यास मासे कापण्याचा सुरीने मानेवर सपासप वार करून नाटेकर याचे डोके त्याचा हातात पकडून नौकेच्या समोरील भागाच्या नाळीवर ठेवलेले पाहीले.ही घटना पाहिल्यानंतर शेख यांनी नौकेवरील वायरलेस सेट च्या मदतीने इतर नौकांना कॉल देवून त्यांना मदतीसाठी बोलावून घेतले.त्यावेळी नौकेवरील इतर खलाशांनी एका एकाने भीतीने नौकेतुन समुद्राचा पाण्यात उड्या मारल्या.त्यानंतर संशयित विश्वकर्मा याने नौकेमधील केबीनचा मागील बाजुकडील डिझेलचा स्टोव्ह मधील डिझेल हे नौकेवरील मासेमारीच्या जाळ्यांवर व नौकेवर ओतले व त्याने नौकेला माचिसने आग लावून पेटवून दिले.हे पाहिल्यानंतर दिलदार शेख यांनीही पाण्यात उडी मारली.नौकेला पुर्णपणे आगीने वेढल्यानंतर संशयित विश्वकर्मा यांनीही पाण्यात उडी मारली व मदतीकरीता आलेल्या इतर नौकेवर चढला.तर इतर खलाशांना मदतीकरता आलेल्या नौकेवर घेण्यात आले अशी फिर्याद दिलदार शेख यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली असून नौकेचा तांडेल रविंद्र काशीराम नाटेकर ५५ रा.साखरी गुहागर याचा निर्घुण खुन करून नौका पेटवून दिल्याप्रकरणी नौकेवरील जेवणी जयप्रकाश धनवीर विश्वकर्मा २७ रा.तपकरा बाधरकोना जशपुरनगर छत्तीसगड याच्याविरूध्द देवगड पोलिसांनी कलम १०३(१), १०९, ३२७(२), १३८ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली.त्याला देवगड न्यायालयासमोर मंगळवारी इेर केल्यानंतर न्यायालयाने ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.तपास पोलिस निरिक्षक अरूण देवकर करीत आहेत.

देवगड समुद्रात सोमवारी दुपारी ही घटना घडल्यानंतर स्थानिक मच्छिमार, मत्स्यव्यवसाय विभाग, पोलिस, सागर पोलिस शाखा, सागर सुरक्षा रक्षक तसेच रत्नागिरी येथील नौका यांच्या सहकार्याने समुद्रात पेटविलेल्या नौकेवरील खलाशांना सुखरूप इतर नौकांवर घेण्यात आले तर हे कृत्य करणारा खलाशी जयप्रकाश विश्वकर्मा याला सागर पोलिस शाखेच्या गस्ती नौकेने देवगड बंदरात आणण्यात आले.नौकेवरील इतर खलाशांना इतर नौकांच्या सहाय्याने सोमवारी रात्री देवगड बंदरात आणण्यात आले.त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही मात्र ते घाबरलेल्या स्थितीत होते.त्यांची ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर सुरक्षित स्थळी त्यांना ठेवण्यात आले.दरम्यान जळीत नौकेलाही आग आटोक्यात आणल्यानंतर देवगड बंदरात आणण्यात आले.ही नौका देवगड जेटी येथे सुरक्षित स्थळी रात्री ठेवण्यात आली.या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधिक्षक ऋषिकेश रावले, पोलिस उपविभागीय अधिकारी घनश्याम आडाव यांनी रात्री देवगडमध्ये येवून माहिती घेतली.मंगळवारी सकाळी देवगड जेटी येथे लावण्यात आलेल्या जळीत नौकेमधील भरलेले पाणी नौका मालक व त्यांचे सहकारी यांनी स्थानिक मच्छिमारांची मदत घेवून भरलेले पाणी तसेच नौकेची जळालेली केबीन, डोल व इतर साहित्य काढून जेटीवर सुरक्षित ठेवण्यात आले.पंपाने पाणी काढण्याचे काढण्याचे काम दिवसभर सुरू होते.दरम्यान देवगड पोलिसांनी सिंधुदूर्ग फॉरेन्सिक टीमला पाचारण केल्यानंतर ही टीम दाखल झाली यावेळी जळीत नौकेतून पाणी काढल्यानंतर मयत तांडेल याच्या हाडांचे काही अवशेष सापडले.या अवशेषांची तपासणी कोल्हापूर व सिंधुदूर्ग फॉरेन्सिक टीम करणार आहे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.किरकोळ वाद मनात ठेवून नौकेवरील जेवणी यांनी हे कृत्य केले.त्यांनी या कृत्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!