17 नोव्हेंबर रोजी मालगुंड येथे होणार पुरस्कार वितरण
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्यातनाम कवयित्री सरिता पवार याना कोकण मराठी साहित्य परिषदेचा नमिता किर लक्षवेधी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रविवार 17 नोव्हेंबर रोजी कवी केशवसुत स्मारक संकुल मालगुंड रत्नागिरी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.रोख रक्कम सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कोमसाप च्या वतीने दरवर्षी वाङ्मयीन व अवाङ्मयीन पुरस्कार दिले जातात. सरिता पवार यांना ग्रामीण भागातील स्त्री लेखिकेसाठी चा अ वाङ्मयीन पुरस्कार कोमसाप च्या वतीने जाहीर झाला आहे. सरिता पवार या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संयत विद्रोही काव्यलेखनासाठी प्रसिद्ध असून त्यांचे कथा काव्य ललित लेख आदी साहित्य प्रसिद्ध आहे. सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहास काव्यरसिक मंडळ डोंबिवली चा राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह, एटीएम राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार, कोल्हापूर येथील राज्यस्तरीय कदंब पुरस्कार, राज्यस्तरीय सारांश पुरस्कार मिरज, राज्यस्तरीय काव्यगौरव पुरस्कार बुलढाणा, राज्यस्तरीय आई पुरस्कार राजापूर आदी पुरस्कार प्राप्त असून त्यांच्या अनेक कथाना राज्य, आंतरराज्य, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. कोमसाप चा पुरस्कार मिळाल्याबद्दल सरिता पवार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.