कुडाळ (प्रतिनिधी) : कै प्राचार्य महेंद्र नाटेकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सोनगड रक्तदाता संघटना जांभवडे पंचक्रोशी व न्यू शिवाजी हायस्कूल जांभवडे माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जांभवडे हायस्कूल येथे हे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. जांभवडे गावचे सरपंच अमित मडव यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर डॉ. संदीप नाटेकर यांच्या हस्ते कै. प्रा. महेंद्र नाटेकर सर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
प्राचार्य महेंद्र नाटेकर सर यांनी स्थापन केलेल्या माधुरी महेंद्र प्रतिष्ठानच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्याचा त्यांचा मानस होता परंतु ते मात्र त्यांचे अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचे काम या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून झालं. जांभवडे पंचक्रोशीच्या विकासासाठी विविध उपक्रम माधुरी महेंद्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेऊन बाबांची अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही आपणास सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत असेही डॉ. संदीप नाटेकर आपल्या भाषणात बोलताना म्हणाले. जसे ज्ञान दिल्याने वाढते तसेच रक्तदान केल्याने ते वाढतं, रक्तदानामुळे आपल्याला कोणता आजार नाही हे स्पष्ट होतं, रक्तदान केल्याचं एक मानसिक समाधान मिळतं. मानसिक समाधान अनेक प्रकारच्या नकारात्मकता दूर ठेवते. तसेच शरीराच्या अंतर्भागातील अवयवांमध्ये सुधारणा होते. रक्तदान हे एक सामाजिक कार्य आहे आणि जांभवडे पंचक्रोशीतील युवक हा समाज कार्य करणार आहे याचा अनुभव आपल्याला अनेक वेळा आला आहे, असे जांभवडे हायस्कूलचे मुख्याध्यापक एस एस सावंत म्हणाले. आम्ही कै. प्राचार्य महेंद्र नाटेकर सरांचे पाईक आहोत त्यामुळे सरांची अपूर्ण राहिलेली पंचक्रोशीसाठीची स्वप्न आम्ही पूर्ण करणारच असा विश्वासही न्यू शिवाजी हायस्कूल जांभवडे माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शरद साळगावकर यांनी समस्त माजी विद्यार्थ्यांच्या वतीने व्यक्त केला. यावेळी पर्यवेक्षक कासले, अमोल तेली, हरिश्चंद्र चव्हाण, डॉ. हळदणकर, डॉ. पाटणकर, डॉ. प्रशांत मडव, नरेंद्रकुमार चव्हाण, धोंडी मडवळ, दत्तू मेस्त्री, आरवारी, अशोक काजरेकर, सुहास तेली, पॉल वॉज आदी उपस्थित होते. अनेक रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा मडव यांनी तर उपस्थितांचे आणि रक्तदातांचे आभार अमोल तेली यांनी मानले.