भरारी पथकाच्या कारवाईत 10 लाख 95 हजार रुपयांची रक्कम जप्त

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता काळात राजारामपुरी येथील कमला कॉलेज समोरील रस्त्यावर वाहनांची तपासणी करीत असताना इर्टिगा (ERTIGA) वाहन क्र. KA 17 P 2567 या क्रमांकाच्या वाहनात 10 लाख 95 हजार रुपये रक्कम आढळून आली असून ही रक्कम भरारी पथकामार्फत जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या रकमेची आयकर विभागामार्फत पडताळणी करण्यात येणार असून त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती 276 कोल्हापूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संपत खिलारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) यांनी दिली आहे.

276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली 3 स्थिर सर्व्हेक्षण पथके (SST) व 11 भरारी पथके (FST) कार्यरत आहेत. भरारी पथक क्र. 9 चे पथक प्रमुख श्रीकांत शंकर माने यांना राजारामपुरी येथील कमला कॉलेज समोरील रस्त्यावर वाहनांची तपासणी करीत असताना ERTIGA वाहन क्र. KA 17 P 2567 या क्रमांकाचे वाहन जात असल्याचे दिसून आल्याने तपासणीकरीता थांबविण्यात आले. या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 10 लाख 95 हजार रुपये रक्कम आढळून आल्याने त्याबाबत संबंधितांकडे चौकशी करण्यात आली. परंतु संबंधितांना रक्कमेबाबत कोणतीही पुराव्याची कागदपत्रे सादर करता आली नाहीत. अथवा समाधानकारक खुलासा करता आला नाही. त्यामुळे ही रक्कम जप्त करुन जिल्हा कोषागार कार्यालयात ठेवण्यात आली असल्याची माहिती या मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सैपन नदाफ तथा करमणूक तहसिलदार यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!