कुडाळ तालुक्यातील एक तर मालवण तालुक्यातील पाच शाळांचा समावेश
कंपनीच्या सी.एस.आर.फंडातून राबविला सामाजिक उपक्रम
चौके (प्रतिनिधी) : कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड असेट मॅनेजमेंट कंपनी च्या सीएसआर फंडातून सामाजिक उपक्रम राबवत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ आणि मालवण तालुक्यातील काही शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप सोमवार 18 नोव्हेंबर आणि मंगळवार 19 नोव्हेंबर या दोन दिवशी करण्यात आले. कॅनरा रोबेको असेट मॅनेजमेंट कंपनीचे आयटी हेड दीपेश गोसावी,गोवा ब्रांच मॅनेजर सुरेश साळगावकर आणि संकेत प्रभु देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सहा शाळांमधील विद्यार्थ्यांना हे मोफत सायकल वाटप करण्यात आले.
दरम्यान सर्वप्रथम कुडाळ तालुक्यातील एस. एल.देसाई विद्यालय पाट आणि कै. एस.आर.पाटील कनिष्ठ महाविद्यालय पाट या शाळेतील विद्यार्थ्यांना 95 सायकलचे वाटप करण्यात आले या ठिकाणी समाजसेवक संजय गोसावी,संस्था संचालक राजेश सामंत, मुख्याध्यापक राजन हंजनकर , ज्येष्ठ शिक्षक गुरुनाथ केरकर,कलाशिक्षक संदीप साळसकर,पर्यवेक्षक बोंदर,शिक्षक प्रतिनिधी तानाजी काळे तसेच लाभार्थी विद्यार्थ्यांचे पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना कंपनीच्या आयटी हेड दीपेश गोसावी यांनी सांगितले की,कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड हा पोस्ट आणि बँकेप्रमाणेच गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय असून यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता. तुम्ही केलेली छोटी छोटी गुंतवणूक भविष्यात फार मोठा परतावा देऊ शकते.एसआयपी या पर्यायातून तुम्ही छोट्या रकमेतून गुतवणूक कॅमेरा रोबेको मध्ये गुंतवणूक करू शकता.लोकांमध्ये पैसे गुंतवण्यासंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी कंपनीच्या वतीने मार्गदर्शन शिबिरेही घेतली जातात. याबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी कॅनरा रोबेको असेट मॅनेजमेंट कंपनीच्या सीएसआर फंडातून गेली दोन वर्षे सिंधुदुर्गातील शाळांमधील होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटपाचा कार्यक्रम कंपनी राबवत आहे. विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत होऊन त्यांचे आरोग्य ही सुदृढ राहावे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या सायकलचा योग्य वापर करून स्वतःची प्रगती साध्य करावी असे प्रतिपादन दिपेश गोसावी यांनी केले.
यानंतर संस्था संचालक राजेश सामंत यांनी कॅनरा रोबेको कंपनीच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून मुलांना दिलेल्या सायकल बाबत कंपनीचे आभार मानले आणि मुलांना सायकलचे फायदे होत असून सायकल मुळे वेळेची बचत होऊन अभ्यासासाठी वेळ मिळतो आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी ही मदत होत आहे असे प्रतिपादन केले.त्यानंतर मालवण तालुक्यातील काळसे येथील श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे या शाळेतील 25 विद्यार्थ्यांना मोफत सायकलचे वाटप करण्यात आले यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक अविनाश परब आणि लिपिक संजय गोसावी आणि इतर सहकारी शिक्षक उपस्थित होते.
तदनंतर चौके येतील भ. ता. चव्हाण म. मा. विद्यालय चौके या शाळेतील 25 विद्यार्थ्यांना मोफत सायकलचे वाटप करण्यात आले या ठिकाणी स्थानिक समिती अध्यक्ष बिजेंद्र गावडे,पालक संघ उपाध्यक्ष शामसुंदर मेस्त्री,मुख्याध्यापिका रसिका गोसावी,नितिन गावडे आदी उपस्थित होते.त्यानंतर जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा कुंभारमाठ या शाळेतील सात विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक श्री.गोसावी आणि इतर सहकारी शिक्षिका उपस्थित होत्या.त्यानंतर मंगळवार 19 नोव्हेंबर रोजी मालवण तालुक्यातीलच पेंडूर येथील न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर या शाळेतील १७ विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले. यावेळी संस्था अध्यक्ष बाबाराव राणे, संचालक संतोष पवार,मुख्याध्यापक सुरेश तावडे आणि विद्यार्थी उपस्थित होते.
त्यानंतर माळगाव येथील ऍडव्होकेट गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कूल माळगाव या प्रशालेमध्ये 25 विद्यार्थ्यांना मोफत सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी कॅनरा रोबेको असेट मॅनेजमेंट कंपनीचे आयटी हेड दीपेश गोसावी,गोवा ब्रांच मॅनेजर सुरेश साळगावकर आणि संकेत प्रभुदेसाई आणि शाळा समिती अध्यक्ष अरुण भोगले खजिनदार महादेव सुर्वे संचालक हेमंत हडकर मुख्याध्यापक उदय जोशी, माजी विद्यार्थी पत्रकार अमोल गोसावी हे उपस्थित होते.
यावेळी शाळा समिती अध्यक्ष अरुण भोगले यांनी कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडअसेट मॅनेजमेंट कंपनीच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले आणि ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना सायकलच्या स्वरूपात दिलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले.