कणकवली (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील वाफोली येथील ६५ एकर जमिन प्रतीएकर १८ लाख दराने खरेदी करण्याचा लेखी करार फिर्यादी रोताश लक्ष्मीचंद तायल रा. द्वारका दिल्ली यांच्यासोबत केला. तसेच त्यांच्याकडून ५० लाख रुपये घेतले. मात्र, सदरची जमिन परस्पर अन्य कंपनीला विकून आपला विश्वासघात करून फसवणूक केल्याप्रकरणी कुडाळ येथे दाखल असलेल्या गुन्हयात संदीप उत्तम चव्हाण व सोनिया संदीप चव्हाण (मुळ शिवडाव, सध्या रा. कलमठ) यांना अतिरीक्त सत्र न्यायाधिश व्ही. एस. देशमुख यांनी प्रत्येकी २५ हजारांचा सशर्थ अटकपूर्व जामिन मंजूर केला. आरोपींच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.
फिर्यादी रोताश तायल हे जमिन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांना बांदा परिसरात जमिनीची आवश्यकता होती. अन्नपुर्णा स्टार एंटरप्रायझेसचे प्रोप्रायटर सोनिया चव्हाण व पती संदीप चव्हाण यांची यानिमित्ताने ओळख झाली. संदीप चव्हाण यांनी वाफोली ता. सावंतवाडी येथे ६५ एकर जमिन उपलब्ध असून तेथील जमिनमालक आपल्या संपर्कात असल्याचा विश्वास फिर्यादीला दिला. त्यानुसार उभयतांत प्रतीएकर १८ लाख रुपयेप्रमाणे दर निश्चित झाला. त्याप्रमाणे ७ मार्च २०२४ रोजी आरोपींशी कुडाळ येथे नोटरी करार करण्यात आला. करारापोटी अॅडव्हान्स म्हणून ५० लाख रु. आरोपींना देण्यात आले.
नऊ महिन्यांच्या कालावधीत कराराची पुर्तता व्हायची होती. मात्र, दरम्यानच्या काळात जून व सप्टेंबर २०२४ मध्ये सदरच्या मिळकती परस्पर वेधीकंश वेलनेस या गुरगांव हरियानास्थित कंपनीला चढ्या भावाने विक्री करण्यात आल्याची माहिती फिर्यादीला मिळाली. त्यावरून कुडाळ पोलीस स्टेशनला फसवणूक प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) व विश्वासघात ३१६ (२) या कलमांखाली आरोपींविरूद्ध २६ नोव्हेंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी आरोपीनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. यावर झालेल्या सुनावणीत आरोपींना प्रत्येकी २५ हजारांचा सशर्थ अटकपूर्व जामिन मंजूर करताना साक्षीदारांवर दबाव न टाकण्याची अट घालण्यात आली आहे.