दिवसाढवळ्या दोन घरे फोडली ; रात्री मोटरसायकल चोरली
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील फोंडाघाट मध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालत दोन घरफोडी आणि मोटारसायकल चोरून तब्बल 5 लाख 21 हजारांचा मुद्देमाल चोरला. एकाच दिवशी झालेल्या या चोरीच्या तीन घटनांमुळे फोंडाघाट मध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांसमोर चोरीचा तपास लावण्याचे कडवे आव्हान आहे. गुरुवार 19 डिसेंबर रोजी फोंडाघाट बोकलभाटले येथील मुकुंद पाटकर यांचे घर फोडून चोरांनी 3 लाख रुपये किंमतीचे साडेसात तोळे सोन्याचे दागिने आणि रोख 20 हजार रक्कमेवर हात मारला. ही चोरी करून पळत असताना पाटकर यांच्या शेजाऱ्यांनी चोरांना पाहिले, स्थानिक ग्रामस्थांनी चोरांचा पाठलागही केला.मात्र चोरटे पळून गेले.पाटकर यांच्या घरात भर दुपारी चोरी झाली.दुसऱ्या घटनेत नवीन कुर्ली वसाहत येथील विजय पंढरीनाथ राणे यांचे घर फोडून 32 हजार किंमतीचे 8 ग्राम सोन्याचे दागिने व रोख 39 हजार रुपये असा 71 हजार चा मुद्देमाल चोरला. विजय राणे हे दुपारी सव्वा बारा वाजता आपल्या नातेवाईकांकडे गेले होते, ते रात्री साडे आठ वाजता घरी परतल्यावर चोरीची घटना उघडकीस आली.तर तिसऱ्या घटनेत गौरेश विठ्ठल लिंगरज यांची सुमारे 1 लाख रुपये किंमतीची नवीन मोटरसायकल चोरट्यानी लांबवली. मोटरसायकल चोरीस गेल्याचे शुक्रवार 20 डिसेंबर रोजी सकाळी समजले. एकाच दिवशी तीन ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनेने फोंडाघाट मध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद देठे, फोंडाघाट पोलीस दुरक्षेत्रचे पोलीस हवालदार वंजारी यांनी घटनास्थळी जात प्राथमिक तपास केला आहे. दिवसाढवळ्या चोरीचे धाडस करणारे चोरटे सराईत असण्याची शक्यता असून चोरीचा छडा लावण्याचे आव्हान कणकवली पोलिसांसमोर आहे.