गुढीपाडव्याच्या निमित्ताने चित्ररथ,लेझीम,ढोलपथक आणि लाठीकाठीसारख्या पारंपरिक खेळांचे प्रदर्शन
तळेरे (प्रतिनिधी) : गुढीपाडव्याचे औचित्य साधून कासार्डे तळेरेत पंचक्रोशीतील शेकडो स्त्री-पुरुष,युवक युवती तसेच शाळकरी लहान मुलांनी एकत्र येत आपल्या पारंपरिक वेशभूषासह सोबत अनेक चित्ररथावरील सजीव देखावे, लेझीम आणि ढोल ताशाच्या गजरात अतिशय उत्साहापुर्ण वातावरणात भव्य शोभायात्रा काढली.गुढी पाडव्याला सुरू मराठी नववर्षाचे पंचक्रोशीतील हिंदू बांधवांनी पारंपरिक पध्दतीने स्वागत केले.
नववर्ष स्वागत व शोभायात्रा समिती कासार्डे-तळेरे पंचक्रोशीच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत सकाळपासून शेकडो हिंदू बांधवांनी कासार्डे तिठा येथे पारंपारिक वेशाभुषेत एकत्र आले आणि याठिकाणी छ.शिवाजी महाराजांवरील सजीव देखावा,बैलगाडीवर गणेश देखावा, पंढरीच्या सावळा विठुरायाचा चित्ररथ,भारतमातेचा चित्ररथ,तसेच गुढी उभारताना सजीव देखावांचे चित्ररथ याशिवाय कासार्डेतील महेंद्र जाधव यांनी साकारलेला ‘वासुदेव ‘ सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होता.
ढोल ताशाच्या गजरावर व भजनाच्या तालावर ही शोभायात्रा मुंबई गोवा महामार्गावरील सर्व्हिस रोडवरुन कासार्डे ते तळेरे बाजारपेठ व तेथून नामदेवआळीमार्गे तळेरे एस.टी स्टॅन्ड समोर उड्डाण पुलाखाली पोहचली त्यांनंतर याठिकाणी, लेझीम, बनाटी, लाठीकाठीसारख्या पारंपरिक खेळांचे प्रदर्शन झाले.यात वयोवृध्द ते शाळकरी मुलांनीही उत्साहात सहभागी घेत आपले कौशल्य सादर केले.
लेझीम,ढोल पथकांचेही छान सादरीकरण झाल्यानंतर सदरची शोभायात्रा परत कासार्डेच्यादिशेने मार्गस्थ झाली.
तत्पुर्वी या शोभायात्रेला डॉ मिलिंद कुलकर्णी,अशोक तळेकर, प्रकाश पारकर य आदींनी मनोगत व्यक्त करतांना सण आणि नववर्षाचे महत्व विशद केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभायात्रा समिती प्रमुख संजय पाताडे यांनी केले.या शोभायात्रेत सर्व क्षेत्रातील मान्यवर तसेच लोकप्रतिनिधीबरोबर, शाळकरी मुले व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला होता.अखेर कासार्डे तिठा येथे ही शोभायात्रा विसर्जित करण्यात आली.