वैभववाडी (प्रतिनिधी) : मराठीतील ज्येष्ठ नाटककार व लेखक प्रेमानंद गज्वी यांची महाड येथे दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी होणाऱ्या तिसऱ्या सम्यक साहित्य कला संगीतीचे उद्घाटक म्हणून निवड करण्यात आली आहे, अशी माहिती अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे सरचिटणीस सुनील हेतकर, संदेश पवार यांनी दिली.
कोकणातील आंबेडकरी चळवळीतून साहित्य व कलेच्या क्षेत्रातून आकारास आलेल्या ‘अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी’च्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून कोकणातील निरनिराळ्या जिल्ह्यात सम्यक साहित्य कला संगीतीचे आयोजन करण्यात येते. यापूर्वी चिपळूण (रत्नागिरी) कणकवली (सिंधुदुर्ग ) आणि आता महाड (रायगड ) या ठिकाणी ही संगीती होत आहे. यापूर्वी या संगीतीचे उद्घाटन लेखिका उर्मिला पवार (चिपळूण), हिंदी साहित्यिक मोहनदास नैमिषराय (कणकवली ) यांच्या हस्ते झाले आहे. आता महाडच्या संगीतीसाठी ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांची निवड करण्यात आली आहे. यापुर्वी प्रेमानंद गज्वी यांची ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे.
१९४७ साली चंद्रपूरमध्ये जन्म झालेल्या प्रेमानंद गज्वी यांचे नाव नाट्यक्षेत्रात विख्यात आहे. शिवाय साहित्य, पत्रकारिता, वृत्तपत्रीय लेखन अशा विविध कार्यक्षेत्राशी ते जोडले गेले आहेत. प्रेमानंद गज्वी यांनी किरवंत, देवनवरी, छावणी, जय जय रघुवीर समर्थ, डॅम इट अनू गाेरे, नूर महंमद साठे, शुद्ध बीजापाेटी, वांझ माती, रंग यात्री , अभिजात तंतू ,द बुद्धा , कळीबंद पाऊस, यासारख्या १५ नाटकांचे तर ‘घाेटभर पाणी’, ‘पांढरा बुधवार’, बेरीज वजाबाकी , वादळाचे पंख, लेकरू, हे राम यासारख्या १६ एकांकिकांचे लेखन केले आहे. ‘ढीवर डोंगा’, ‘लागण’ या कथासंग्रहांसह ‘जागर’, ‘हवे पंख नवे’ या कादंबर्यांचं लेखनही त्यांनी केले आहे. त्यांच्या नाटकांत काव्याला अधिक महत्व असून ‘एकतारी’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित आहे. नाट्य रसिकांच्या मनात घर करून राहिलेल्या किरवंत या नाटकाचा अनुवाद हिंदी, कन्नड, तेलुगू, बंगाली, इंग्लीश व रशियन भाषेत झाला आहे. ‘घाेटभर पाणी’ या एकांकिकेचे १४ भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. किरवंत, तन-माजोरी, देवनवरी, गांधी-आंबेडकर या नाटकांचा बी ए / एम ए च्या अभ्यासक्रमात समावेश आहे, तर ‘उतारा’ ही एकांकिका मुंबई विद्यापिठाच्या अभ्यासक्रमात आहे. ‘हवे पंख नवे’ या कादंबरीचं रुपांतर नाटकात झालं आहे. त्यांच्या नाटकासंबंधी दहा विद्यार्थ्यांनी संशोधन (पीएचडी) केले आहे. ‘बोधी’ या नाट्यसंस्थेची स्थापना करून त्यांनी आपला नाट्यक्षेत्रात वेगळा ठसा उमटवलेला आहे. या संस्थेच्या माध्यमातून नाट्यशाळा घेऊन नवनव्या उत्कृष्ट नाटकांना व लेखकांना रंगमंच देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. अलीकडेच त्यांचे ‘रंग निरंग’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे.
‘गांधी-आंबेडकर’मधून मांडला महापुरुषांचा संघर्ष !
‘किरवंत’, ‘देवनवरी’ या नाटकातून त्यांनी दुर्लक्षित विस्थापितांची बाजू मांडली. गांधी- आंबेडकर या नाटकातून महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दाेन महापुरुषांमधील वैचारिक संघर्ष अत्यंत प्रभावीपणे रेखाटला आणि तो नाट्यप्रेमींसमोर आणला.
प्रेमानंद गज्वी यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवन गाैरव पुरस्कार मिळाला आहे. तसेच २००९ मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने त्यांना वि.वा. शिरवाडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘सगुण निगुण’ या वैचारिक लेखनाला अनंत काणेकर पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांना पाच वेळा राज्य वाड्मय पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले आहे. संगीतीच्या उद्घाटकपदी गज्वी यांची निवड झाल्यामुळे साहित्य, कला, नाट्य वर्तुळात त्यांचे अभिनंदन केले जात आहे.













